संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाकार्याचा जागर! ; उपजिल्हा रुग्णालयाला पंख्यांची भेट; रक्तदानातून ‘जीवनदान’, कर्मचाऱ्यांचा सन्मान अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

सावंतवाडी : वाढदिवसाचा उत्सव केवळ जल्लोषात न साजरा करता तो समाजसेवेच्या माध्यमातून जनहिताचा सोहळा ठरविण्याची परंपरा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा पाहायला मिळाली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला सिलींग फॅन व वॉल फॅन भेट देण्यात आले. तर नगरसेवक देव्या सूर्याजी मित्रमंडळ आणि युवा रक्तदाता संघटनेच्या पुढाकारातून आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय लक्षात घेऊन रुग्णालयासाठी सिलींग फॅन आणि वॉल फॅन भेट स्वरूपात देण्यात आले. त्यानंतर आयोजित रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनीही स्वतः रक्तदान करून सामाजिक संदेश दिला.

रुग्णालयातील ‘सेवेकऱ्यां’चा सन्मान

या उपक्रमाचे औचित्य साधून रुग्णालयातील स्वच्छता व सेवाकार्यात योगदान देणारे सफाई कर्मचारी श्रीकृष्ण सावंत, मनोहर कासकर, सूर्यकांत जाधव, सुवर्णा कोठावळे, दिव्या जाधव आणि संजय ऐडगे यांचा सन्मान करण्यात आला. रुग्णालय स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.

याचवेळी भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल आर्य गावडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. देशसेवेची संधी मिळालेल्या आर्य गावडे यांच्या यशाचे कौतुक करत उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

चराठ्यात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे हास्य

वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची ही सेवा-साखळी चराठा येथेही पोहोचली. शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप, वृक्षांचे वाटप तसेच शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावत पर्यावरण संवर्धनाचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला.

वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम उपस्थितांचे लक्ष वेधून गेला. रक्तदानातून जीवनदान, रुग्णालयाला सुविधांची भेट, सेवकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि वृक्षवाटप अशा विविध उपक्रमांतून संजू परब यांच्या वाढदिवसाला सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीची किनार लाभली.

यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, माजी सभापती अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य व आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles