सावंतवाडी : शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक मोती तलाव परिसरात नागरिक, पर्यटक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची मोठी वर्दळ असते. मात्र, तलावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सध्या उपलब्ध असलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अतिरिक्त आणि प्रभावी सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. तलाव परिसरातील नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तलावात एखादी व्यक्ती चुकून पडल्यास तिला स्वतःहून बाहेर येणे कठीण होऊ शकते. त्यामुळे तलावाभोवती मजबूत सुरक्षा जाळी व संरक्षक फेन्सिंग, तलावाच्या आतील बाजूस ठराविक अंतरावर स्टीलच्या रेस्क्यू शिड्या, तसेच लाईफ बॉय, लाईफ जॅकेट आणि मजबूत दोरी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पाण्यात पडलेल्या व्यक्तीला तातडीने आधार मिळावा यासाठी तरंगती सुरक्षा दोरी, आपत्कालीन बचाव कार्यासाठी सुरक्षित पायऱ्या व रेस्क्यू प्लॅटफॉर्म, तसेच ‘धोकादायक खोल पाणी’, ‘सावधान’ आदी सूचना फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय तलाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक दर्शविणारे फलक उभारावेत. सुरक्षा उपाययोजनांची नियमित तपासणी व देखभाल करण्यासाठी स्वतंत्र जबाबदार यंत्रणा नियुक्त करावी, अशीही मागणी करण्यात आली.
“तलाव परिसर हा नागरिकांच्या विरंगुळ्याचे ठिकाण असले, तरी सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होता कामा नये. संभाव्य दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात,” अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, शहरप्रमुख श्री. बाबू उर्फ खेमराज कुडतरकर, नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर, नगरसेविका सौ. स्नेहा नाईक, सौ. सुप्रिता धारणकर आणि सौ. भारती परब उपस्थित होत्या.
तलाव परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत शिवसेनेने प्रशासनाचे लक्ष वेधले असून, या मागण्यांवर नगरपरिषद प्रशासन कोणती कार्यवाही करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



