कुडाळ : महाराष्ट्रात व्यवसाय, रोजगार आणि उदरनिर्वाहाची संधी मिळणाऱ्या प्रत्येकाने महाराष्ट्राची भाषा आणि संस्कृती जाणून घेणे आवश्यक आहे. याच भावनेतून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या पुढाकाराने आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) माध्यमातून राबविण्यात आलेल्या ऐतिहासिक मराठी भाषा अभियानाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल एक लाख ५६ हजार अमराठी रिक्षा, टॅक्सी, टेम्पो तसेच ओला-उबेर-रॅपिडो चालकांनी मराठी भाषेचे धडे घेतले, अशी माहिती कोमसापचे कार्याध्यक्ष तथा साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी कुडाळ येथे दिली.
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाच्या वतीने या उपक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, खजिनदार अनंत वैद्य, सहसचिव सुरेश पवार, रुजारिओ पिंटो, संदीप वालावलकर, निलेश जोशी, अभिमन्यू लोंढे, दिपाली काजरेकर, वृंदा कांबळी, प्रा. संतोष वालावलकर, दीपक पटेकर, वर्षा वैद्य, दत्तात्रेय उर्फ बाळ पुराणिक आदी उपस्थित होते.
३६ वर्षे कागदावर राहिलेला निर्णय प्रत्यक्षात –
यावेळी बोलताना डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले की, महाराष्ट्रात वाहन चालविण्याचा परवाना किंवा परमिट घेणाऱ्या अमराठी चालकांना मराठी बोलता येणे आवश्यक असल्याचा शासन निर्णय १९८९ मध्येच घेण्यात आला होता. मात्र, तब्बल ३६ वर्षे या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयात पुढाकार घेतल्यानंतर या निर्णयाला प्रत्यक्ष स्वरूप मिळाले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीही या उपक्रमाला आर्थिक व संस्थात्मक पाठबळ दिले.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ अंतर्गत १ मे रोजी सुरू झालेल्या या उपक्रमाची १५ ऑगस्ट रोजी सांगता झाली. या अभियानाची महत्त्वाची जबाबदारी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थांवर सोपविण्यात आली होती.
३६ जिल्ह्यांत १,६०० कार्यकर्ते मैदानात!
राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत कोमसापचे सुमारे १,६०० साहित्यिक, प्राध्यापक आणि कार्यकर्ते अमराठी वाहनचालकांना व्यवहारातील मराठी शिकविण्यासाठी कार्यरत होते. अवघड व्याकरण किंवा मोठा अभ्यासक्रम न शिकवता दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारी मराठी वाक्ये शिकविण्यावर भर देण्यात आला. दररोज चार वाक्यांचा सराव करून घेत चालकांना आत्मविश्वासाने मराठी बोलण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
रिक्षा-टॅक्सी चालकांसह ओला, उबेर आणि रॅपिडोच्या चालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठी बोलण्याबाबत असलेला न्यूनगंड दूर करून आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम कोमसापच्या कार्यकर्त्यांनी केले.
प्रशिक्षणानंतर तोंडी परीक्षा, हजारो चालक उत्तीर्ण –
प्रशिक्षणानंतर कोमसापचे प्रशिक्षक, साहित्यिक आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चालकांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चालकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. राज्यातील एक लाख ५६ हजार चालकांनी मराठीचे प्रशिक्षण घेतले, तर ७ हजार ७५० चालक या परीक्षेत अपयशी ठरले. मात्र, अपयशी चालकांनीही पुन्हा अभ्यास करून परीक्षा देण्याची तयारी दर्शविली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिल्याने आणखी अनेक अमराठी वाहनचालक स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्याचे डॉ. ढवळ यांनी सांगितले.
सिंधुदुर्गातील प्रमाणपत्रे आरटीओकडे सुपूर्त –
१७ ऑगस्ट रोजी ठाणे येथे या उपक्रमाचा भव्य प्रमाणपत्र वितरण सोहळा झाला. त्याचवेळी राज्यातील सुमारे ५० आरटीओ विभागांमध्ये उत्तीर्ण चालकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना देण्यात येणारी प्रमाणपत्रेही आरटीओ अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आली.
“सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत अमराठी बांधवांची संख्या तुलनेने कमी असली, तरी हा उपक्रम केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत राबविण्यात आला,” असे डॉ. ढवळ यांनी स्पष्ट केले.
‘भाषा शिकवणे ही केवळ अट नव्हे, महाराष्ट्राशी जोडण्याची प्रक्रिया’
“नियम केवळ कागदावर राहता कामा नयेत. त्यांची पूर्तता करताना मानवतेच्या दृष्टिकोनातून भाषा शिकविणे आवश्यक होते. साहित्यिकांचे कार्य केवळ कविता, कथा किंवा कादंबरी लेखनापुरते मर्यादित नसून समाजासाठी काही करण्याची संधी या उपक्रमातून मिळाली. मराठी भाषेचा जागर आणि उत्सव करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” असे डॉ. ढवळ यांनी सांगितले.
“महाराष्ट्राने आपल्याला व्यवसाय आणि उदरनिर्वाहाची संधी दिली आहे. त्यामुळे येथील भाषा शिकणे ही केवळ परवाना मिळविण्याची अट न राहता महाराष्ट्राशी जोडले जाण्याची प्रक्रिया व्हावी,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उर्वरित अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांनीही पुढे येऊन मराठी भाषा शिकावी, असे आवाहन त्यांनी केले.
आरटीओ अधिकाऱ्यांकडून कोमसापचे कौतुक!
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संतोष सावंत यांनी केले, तर कार्यक्रमाची रूपरेषा जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी मांडली. हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल कोमसापच्या जिल्हा मंडळाच्या वतीने डॉ. प्रदीप ढवळ आणि आरटीओ अधिकारी श्री. माने यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आरटीओ अधिकारी श्री. माने यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे विशेष आभार मानत, “अशा प्रकारचे सामाजिक आणि भाषिक उपक्रम सातत्याने राबवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत,” अशी ग्वाही दिली.
एकीकडे शासनाचा निर्णय आणि दुसरीकडे साहित्यिकांची सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम मराठी भाषा संवर्धनाच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.



