युवा शक्तीला विधायक नेतृत्वाची दिशा!, तुळस येथे युवा नेतृत्व शिबीर संपन्न. ; पंचायत राजमधील सहभाग, नेतृत्वगुण आणि ताण-तणाव व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन.

वेंगुर्ला : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कोकण विकास संस्था, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने WeLead उपक्रमांतर्गत आयोजित युवक-युवती नेतृत्व शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांच्या हस्ते श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथील कर्मयोगी रामभाऊ तुळसकर स्मृती सभागृहात उत्साहात झाले. या शिबिरास युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी श्री शिवाजी हायस्कूल, तुळसचे मुख्याध्यापक विनायक कोल्हे, प्रगती चव्हाण, संदीप तुळसकर, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, महेश राऊळ, अश्विनी चव्हाण, संजना तुळसकर, सोनाली नाईक, बबन घोडे-पाटील आदी उपस्थित होते.


उद्घाटनप्रसंगी प्रगती चव्हाण यांनी पंचायत राज व्यवस्थेतील युवक-युवतींची भूमिका, नेतृत्वगुण तसेच ताण-तणाव व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “गावाच्या विकासाच्या निर्णयप्रक्रियेत युवक-युवतींचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. पंचायत राज व्यवस्था ही लोकशाहीच्या मुळाशी जोडलेली व्यवस्था असून, युवकांनी ग्रामसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या गावाच्या विकासात योगदान दिले पाहिजे.”
त्या पुढे म्हणाल्या, “आजच्या धकाधकीच्या जीवनात युवकांसमोर शिक्षण, करिअर, रोजगार आणि विविध सामाजिक जबाबदाऱ्यांची आव्हाने आहेत. त्यामुळे या आव्हानांचा सामना करताना ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. ताण आला म्हणून खचून न जाता त्यामागील कारण समजून घेणे, सकारात्मक विचार करणे, वेळेचे योग्य नियोजन करणे आणि गरजेनुसार संवाद साधणे महत्त्वाचे आहे. मानसिकदृष्ट्या सक्षम असलेला युवकच प्रभावी नेतृत्व करू शकतो.”
“नेतृत्व म्हणजे केवळ पद मिळवणे नव्हे, तर संकटाच्या काळात योग्य निर्णय घेणे, इतरांना सोबत घेणे आणि समाजाच्या हितासाठी जबाबदारी स्वीकारणे होय. युवक-युवतींनी आत्मविश्वास, संवादकौशल्य, निर्णयक्षमता आणि ताण-तणाव हाताळण्याची क्षमता विकसित केली, तर ते स्वतःच्या आयुष्यासोबतच आपल्या गावाच्या विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात,” असेही प्रगती चव्हाण यांनी सांगितले.
पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांनी युवकांच्या ऊर्जेचे आणि क्षमतेचे कौतुक करताना सांगितले, “युवक-युवती हे देशाचे भविष्य असून त्यांच्या विचारांना योग्य दिशा आणि संधी मिळणे आवश्यक आहे. आजच्या युवकांनी शिक्षणासोबतच सामाजिक भान, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित केली पाहिजे. गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणारी आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारी युवा पिढी घडणे ही काळाची गरज आहे.”
ते पुढे म्हणाले, “युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि नवीन काही करण्याची क्षमता असते. या ऊर्जेला योग्य दिशा मिळाल्यास गाव, समाज आणि देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होऊ शकते. युवकांनी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत आपल्या परिसरातील प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा.”
शिबिरामध्ये युवक-युवतींमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य, निर्णयक्षमता, ताण-तणाव व्यवस्थापन, सामाजिक जबाबदारी, टीमवर्क तसेच स्थानिक विकासामधील युवकांची भूमिका याबाबत विविध उपक्रम आणि मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी युवक-युवतींना स्वतःच्या क्षमता ओळखून सकारात्मक दृष्टिकोनातून नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
‘नेतृत्वाची सुरुवात… बदलाची वाटचाल!’ या उद्देशाने आयोजित या शिबिरामुळे युवक-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. युवकांच्या क्षमतेला योग्य व्यासपीठ आणि मार्गदर्शन मिळाल्यास गावाच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया वराडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैष्णवी परूळकर यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles