आडाळी एमआयडीसीच्या औद्योगिक भरारीला आणखी बळ!, ऑटोमेजचा २५० कोटींचा प्रकल्प आडाळीत! ; ५०० हून अधिक तरुणांना रोजगाराची संधी. : आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश. ; दोडामार्गच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा!

मुंबई : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाच्या वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, आडाळी एमआयडीसीमध्ये ऑटोमेज कंपनीकडून तब्बल २५० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला महत्त्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्प साकारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील ५०० हून अधिक तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या संदर्भात आज मुंबई येथे ऑटोमेज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अतीन अग्रवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवींद्र रणसिंग यांच्यासोबत आमदार दीपक केसरकर यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी आडाळी एमआयडीसीमध्ये कंपनीचा नवीन प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

२५० कोटींची गुंतवणूक आणि ५०० हून अधिक रोजगारनिर्मिती, यामुळे आडाळी एमआयडीसीच्या औद्योगिक क्षितिजावर विकासाचे नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक तरुणांना रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर किंवा परराज्यात धाव घ्यावी लागू नये, तसेच सिंधुदुर्गच्या भूमीतच उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात, या दृष्टिकोनातून हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

ऑटोमेज कंपनीचे भारतात विविध ठिकाणी पाच कारखाने कार्यरत असून परदेशातही कंपनीचा एक कारखाना सुरू आहे. त्यामुळे आडाळीत येणाऱ्या या प्रकल्पाकडे औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

आडाळी एमआयडीसी आता केवळ औद्योगिक वसाहत न राहता रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाचे नवे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या नव्या प्रकल्पामुळे दोडामार्गसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles