माणगाव सेवा सोसायटीची रौप्यमहोत्सवी वाटचाल दिमाखात! ; ७५० सभासदांच्या उपस्थितीत वार्षिक अधिमंडळ सभा उत्साहात. ; सभासदांना घमाले, फावडे, सुपारीचे रोप व स्नेहभोजनाची अनोखी भेट.

माणगाव  : विश्वास, सहकार आणि शेतकरी हिताची पंचवीस वर्षांची भक्कम परंपरा जपत माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, माणगावने रौप्य महोत्सवी वर्षात दिमाखात पदार्पण केले. या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा आनंद द्विगुणित करत माणगाव येथील त्रिमूर्ती हॉलमध्ये संस्थेची ७५ वी वार्षिक अधिमंडळ सभा उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत संस्थेच्या वतीने सर्व सभासदांचा अनोख्या पद्धतीने गौरव करण्यात आला. प्रत्येक सभासदाला दोन घमाले, एक फावडे, सुपारीचे रोप आणि स्नेहभोजन देण्यात आले. सहकाराच्या नात्याला सामाजिक बांधिलकीची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे सभासदांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

या सभेला तब्बल ७५० सभासदांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. यावेळी संस्थेचे चेअरमन शंकर उर्फ अवी राणे यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करून संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला.

शेतकरी सभासदांच्या आर्थिक उन्नतीला केंद्रस्थानी ठेवून रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेच्या माध्यमातून सोने तारण योजना, विविध कर्ज योजना तसेच अन्य लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त सभासदांनी घ्यावा आणि संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन अवी राणे यांनी केले.

संस्थेने आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभाराची परंपरा कायम ठेवत ८५ टक्के कर्जवसुली साध्य केल्याबद्दल तसेच पारदर्शक अहवाल सादर केल्याबद्दल सभासदांनी संचालक मंडळाचे कौतुक केले. सहकाराच्या माध्यमातून संस्थेची वार्षिक उलाढाल आणखी उंचावून माणगाव विभागातील शेतकरी सभासदांना अधिकाधिक आर्थिक बळ देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, संस्थेच्या एका विद्यमान संचालकाच्या अकस्मिक निधनाबद्दल सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करत उपस्थितांनी आदरांजली वाहिली.

यावेळी संस्थेचे चेअरमन शंकर उर्फ अवी राणे, व्हाईस चेअरमन सिताराम कालवणकर, संचालक रामचंद्र धुरी, हरी कुडतरकर, भिकाजी उर्फ बापू बागवे, पांडुरंग परब, सखाराम गोसावी, नारायण कदम, महादेव गावडे, सौ. अश्विनी माडगूत, श्रीमती रत्नप्रभा तेली, संस्थेचे सचिव केशव माळकर तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

पंचवीस वर्षांच्या विश्वासाच्या पायावर उभी राहिलेली माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आता नव्या योजनांच्या माध्यमातून प्रगतीची नवी उंची गाठण्यास सज्ज झाली असून, रौप्यमहोत्सवी वर्षाने संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीला नवा अध्याय जोडला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles