सावंतवाडीत आज रंगणार दहीहंडीचा अफलातून थरार! ; ‘सुंदरवाडी दहीहंडी’साठी अभिनेते कुशल बद्रिकेच्या उपस्थितीने रंगणार जल्लोष! ; मर्दानी खेळ, ढोलपथक अन् पारंपरिक नृत्याची मेजवानी! ; जनतेला उपस्थित राहण्याचे संदीप गावडे यांचे विनम्र आवाहन.

सावंतवाडी: गोविंदांच्या उत्साहाला उधाण आणणारा, ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात रंगणारा ‘सुंदरवाडी दहीहंडी’चा थरार आज सावंतवाडीत अनुभवायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग भाजपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये या उत्सवाची कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या पटांगणावर आज सायंकाळी ५ वाजता दहीहंडीचा हा रंगतदार सोहळा रंगणार आहे. विशेष म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रिके यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याचे खास आकर्षण ठरणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे दहीहंडीच्या उत्साहाला आणखी रंगत येणार आहे.

दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये थरारक चुरस पाहायला मिळणार असून, सर्वाधिक थर रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे बक्षिसाच्या या दिमाखदार रकमेने गोविंदा पथकांचा उत्साह आणखी द्विगुणित झाला आहे.

दरम्यान, दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचीही जोरदार मेजवानी सज्ज करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण, ढोलपथकाचा दणदणाट आणि पारंपरिक नृत्याविष्कार यामुळे राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाचे पटांगण आज उत्साहाने दुमदुमणार आहे.

परंपरा, साहस, कला आणि मनोरंजन यांचा अनोखा संगम असलेल्या या ‘सुंदरवाडी दहीहंडी’ उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन भाजपा नेते संदिप गावडे यांच्यासह सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

आजची संध्याकाळ सावंतवाडीकरांसाठी जल्लोषाची… थरावर थर चढणार, ढोल-ताशांचा निनाद होणार आणि ‘सुंदरवाडी दहीहंडी’चा थरार शिगेला पोहोचणार!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles