मुंबई : ‘पौर्णिमेचा फेरा’ ही हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत या हॉरर कॉमेडी वेबसीरिजची चाहत्यांची आतुरता आता संपली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत ‘पौर्णिमेचा फेरा’ या वेब सीरीजची निर्मिती पायल गणेश कदम यांनी केली आहे. तसेच या वेब सीरीजच्या दिग्दर्शनाची धुरा अजय सरतपे यांनी सांभाळली आहे.
‘पौर्णिमेचा फेरा’ हॉरर कॉमेडी वेब सीरिज प्रदर्शित
या सीरिजमध्ये निखिल बने, मंदार मांडवकर, सिद्धेश नागवेकर, संजय वैद्य, प्राची केळुस्कर, संदीप रेडकर, दीपा माळकर, चंदनराज जामदाडे, स्नेहल आयरे, दर्शना पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शुभम विलास कदम यांची कथा असलेल्या या सीरिजचे संवाद, लेखन संदेश लोकेगावकर यांनी केले आहे. ही वेब सीरीज तुम्हाला शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळेल.
अनेक रहस्य उलगडणार –
कोकण आणि भुतांची गोष्टी हे जणू समीकरणचं मानलं जातं. आता ‘पौर्णिमेचा फेरा’ सीरिजमध्ये यासंबंधित अनेक रहस्य उलगडणार आहेत. या सीरीजची कहाणी कोकणातील असून या चित्रपटाचं शूटींगही कोकणात झालं आहे. या सीरिजमध्ये तीन मित्र त्यांच्या मित्राच्या कोकणातील वडिलोपार्जित घरी भेट देतात. या तीन मित्रांचा कोकणातला प्रवास, या प्रवासादरम्यान घडलेली घटना, त्यात दडलेली रहस्ये या सीरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. या वेब सीरिजमध्ये प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत.
निसर्ग सौंदर्यासह हॉरर कॉमेडीचा तडका –
कोकण म्हणजे निसर्ग. या वेबसीरिजचे चित्रीकरण मुंबईसह कोकणातील गुहागर येथे काही भागांत झालं आहे. यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्यही तुम्हाला यामध्ये अनुभवता येणार आहे. कोकणातील ही रहस्ये काय असतील? पौर्णिमेच्या चंद्राचा आणि या घटनांचा काय संबंध असेल, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असतील तर या सगळ्यांची उत्तरे ‘पौर्णिमेचा फेरा’ वेब सीरीज पाहून तुम्हाला मिळतील.
रहस्य, रोमांच, भीतीसह कॉमेडीचा टच –
‘पौर्णिमेचा फेरा’ वेब सीरिजच्या निर्मात्या पायल कदम म्हणाल्या की , “या वेब सीरिजचा जॉनर हॉरर कॉमेडी असून हा जॉनर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा आहे. ‘पौर्णिमेचा फेरा’ सीरीजचं वैशिष्ट्य म्हणजे या कथेत रहस्य, रोमांच, भीती असतानाच त्याला कॉमेडीचा टच देण्यात आला आहे. यामुळे ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे .