‘मांड’ थांबला… नाती तुटली… अन् सामाजिक वर्तुळाची दारेही बंद! ; मालवण तालुक्यातील एका गावात कुटुंबावर सामाजिक बहिष्काराचा खळबळजनक आरोप. ; अन्यायग्रस्त महिलेची पोलिसांत धाव, चार जणांविरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची मागणी, राज्य मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार दाखल.

मालवण : पिढ्यान्‌पिढ्या जपलेली नाती… सण-उत्सवांतून फुललेला आपलेपणा… सुख-दुःखात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची गावची परंपरा… मात्र याच सामाजिक एकोप्याला तडा गेल्याचा खळबळजनक आरोप मालवण तालुक्यातील एका गावातून समोर आला आहे. ‘मांड’पासून सामाजिक व्यवहारापर्यंत आपल्या कुटुंबाला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले, गावातील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांची दारे बंद करण्यात आली, असा गंभीर आरोप करीत अन्यायग्रस्त महिलेने थेट मालवण पोलिस ठाण्याची वाट धरली आहे.

२७ जुलै २०२६ रोजी दाखल केलेल्या तक्रारीमुळे गावातील सामाजिक वातावरण चर्चेचा विषय बनले असून, चार व्यक्तींविरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने केली आहे. यासोबतच राज्य मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार दाखल केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पिढ्यान्‌पिढ्यांच्या नात्यांवर बहिष्काराची सावली?

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, सदर गाव हे त्यांचे माहेर आणि सासर दोन्ही आहे. वाडीतील सुमारे २५० ग्रामस्थांशी त्यांचे कुटुंब पिढ्यान्‌पिढ्या सामाजिक व धार्मिक संबंध जपत आले आहे. सण-उत्सव, धार्मिक विधी, लग्नकार्ये आणि सुख-दुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या घरात जाण्याची परंपरा असताना अचानक आपल्या कुटुंबाभोवती ‘सामाजिक अलिप्ततेची भिंत’ उभी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गावातील चार व्यक्तींनी वैयक्तिक द्वेषातून ग्रामस्थांवर दबाव आणून आपल्या कुटुंबाशी कोणीही संबंध ठेवू नये, त्यांच्या घरी जाऊ नये, कुटुंबातील सदस्यांशी बोलू नये, त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू नये तसेच सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी करून घेऊ नये, अशी सक्ती केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

‘मांड’च्या परंपरेला यंदा खंड; धार्मिक नात्यालाही तडा गेल्याचा आरोप!

या संपूर्ण प्रकरणातील सर्वाधिक भावनिक आणि गंभीर बाब म्हणजे शिमगोत्सवातील पारंपरिक ‘मांड’.

तक्रारदार महिलेच्या माहेरी ग्रामपंचायत घर क्रमांक १४ येथे पिढ्यान्‌पिढ्या शिमगोत्सवाच्या पाचव्या दिवशी वाडीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत ‘मांड’ फिरविण्याची परंपरा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, यंदा संबंधित व्यक्तींनी ग्रामस्थांना तेथे जाण्यास मनाई केल्याने पिढ्यान्‌पिढ्यांची धार्मिक परंपरा खंडित झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

इतकेच नव्हे, तर तक्रारदार महिलेच्या सासरच्या घर क्रमांक २३ येथेही शिमगोत्सवातील ‘मांड’ आणण्यात आला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

एका कुटुंबाच्या घराची दारेच नव्हे, तर परंपरेशी जोडलेली सामाजिक नातीही बंद करण्याचा प्रयत्न झाला का? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

लग्नकार्यांपासून सत्यनारायण पूजेपर्यंत दूर ठेवल्याचा आरोप –

शिमगोत्सवापुरतेच हे प्रकरण मर्यादित नसून, वाडीतील लग्नकार्ये, सत्यनारायण पूजा तसेच अन्य सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांपासून आपल्या कुटुंबाला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात येत असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

कार्यक्रमांचे निमंत्रण देऊ नये, कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घेऊ नये, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पत्रे पाठवली… विनवण्या केल्या… पण तोडगा निघाला नाही!

बहिष्काराच्या प्रकाराबाबत तक्रारदार महिला व त्यांच्या पतीने २५ मे २०२६ रोजी ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर १० जुलै २०२६ रोजी पुन्हा पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, काही पत्रे स्वीकारण्यात आली नाहीत, तर काही पत्रांवर अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, २० जुलै रोजी ग्रामस्थ मंडळाशी संबंधित एका व्यक्तीने आपण पदाधिकारी नसल्याने निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे पत्राद्वारे कळविल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. मात्र, संबंधित व्यक्ती मंडळाचे सचिव असल्याचा दावा करीत, त्याबाबतचा डिजिटल व्हिडिओ पुरावा आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

न्याय मागितला… उलट व्हॉट्सॲप ग्रुपमधूनही बाहेर?

आपल्या कुटुंबावर टाकण्यात आलेल्या कथित बहिष्काराबाबत तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थ मंडळाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर अनेकदा विनंती करण्यात आली. ‘बैठक घ्या, चर्चा करा आणि हा सामाजिक तिढा सोडवा,’ अशी मागणीही केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मात्र, या विनंतीची दखल न घेता २६ जुलै २०२६ रोजी आपल्यालाच ग्रामस्थ मंडळाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

‘सामाजिक जीवन जगणेच अडचणीचे झाले’

या कथित बहिष्कारामुळे आपले आणि कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण होत असून, सामाजिक जीवन जगणेच अडचणीचे झाले आहे, अशी व्यथा तक्रारदार महिलेने पोलिसांकडे मांडली आहे. महिला म्हणून आपले मनोधैर्य खच्चीकरण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

सामाजिक बहिष्काराच्या आरोपामुळे गावातील परंपरा, सामाजिक सलोखा आणि व्यक्तीच्या मूलभूत सामाजिक हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कायद्याचा आधार घेत न्यायाची मागणी –

महाराष्ट्रातील सामाजिक बहिष्कारास प्रतिबंध करणाऱ्या महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१६ अंतर्गत सामाजिक बहिष्कारास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात सामाजिक बहिष्कार घडवून आणण्यासंदर्भात शिक्षेची तरतूद आहे.

याच पार्श्वभूमीवर तक्रारदार महिलेने मालवण पोलिसांनी तक्रारीची तात्काळ दखल घ्यावी, संबंधितांविरोधात कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आवश्यक ती कारवाई करावी आणि आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, तक्रारीत आरोप करण्यात आलेल्या संबंधित व्यक्तींची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यांची भूमिका किंवा स्पष्टीकरण उपलब्ध झाल्यास तेही वृत्तात समाविष्ट केले जाईल.

आता या तक्रारीवर मालवण पोलिसांकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि कथित सामाजिक बहिष्काराच्या या आरोपांची चौकशी कोणत्या दिशेने जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles