सावंतवाडी : जिद्द, मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कबड्डीच्या मैदानात दमदार कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात आपल्या यशाचा ठसा उमटविला आहे. दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलींची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड, तर राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सावंतवाडीच्या मुलांच्या संघाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात आगेकूच केली आहे.
दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या मुलींनी कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. ‘जिद्द, मेहनत आणि संघर्ष… यशाची खरी गुरुकिल्ली!’ या ब्रीदाला साजेशी कामगिरी करत विद्यार्थिनींनी शाळेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
दरम्यान, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी येथील मुलांच्या संघाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६-२७ मध्ये प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. दमदार बचाव, आक्रमक चढाया आणि सांघिक खेळाच्या जोरावर संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत ही उल्लेखनीय कामगिरी केली.
या यशामुळे दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तालुक्यातील क्रीडा क्षेत्रासाठी ही कामगिरी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतही या खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीची पुनरावृत्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



