सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील दोन मोठ्या रकमेच्या बिलांवरून निर्माण झालेल्या वादावर पाणीपुरवठा सभापती सिताराम गुंडू बांदेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात केलेल्या निवेदनातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित बिलांमध्ये तफावत आढळल्याने आपण आणि समिती सदस्यांनी बिल अदा करण्यापूर्वी कार्यपूर्ती अहवाल व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली होती, असा दावा बांदेकर यांनी केला आहे.
श्री. बांदेकर यांच्या निवेदनानुसार, ८ जून २०२६ रोजी रु. ७ लाख ५० हजार ७६२ आणि रु. ९ लाख ८७ हजार ९४४ अशी दोन बिले सादर करण्यात आली. नियमितपणे येणाऱ्या बिलांच्या तुलनेत या रकमांमध्ये मोठी वाढ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित कामांचा लेखी कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर पाणीपुरवठा समितीसमोर वेगवेगळ्या रकमेचे तीन अहवाल सादर करण्यात आल्याचे बांदेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे हिशोब व ताळेबंदाबाबत संशय निर्माण झाल्याने, ८ ऑगस्ट रोजी संबंधित अहवाल सादर झाल्यानंतरच बिल अदा करण्यात यावे, अशी भूमिका आपण व समिती सदस्यांनी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नळसामान रजिस्टर आणि बिलात तफावत?
बांदेकर यांच्या म्हणण्यानुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित कर्मचाऱ्याने नळसामान रजिस्टर आणि बिलामध्ये तफावत असल्याचे मान्य करणारे पत्र दिले. त्यानंतर नळसामान रजिस्टर गहाळ झाल्याची माहिती विभागप्रमुखांकडून मिळाली. CCTV फुटेजची तपासणी केल्यानंतर संबंधित कर्मचारी रजिस्टर हाताळताना व ते घेऊन जाताना दिसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अहवाल समितीच्या बैठकीत सादर झाल्यानंतर तो स्थायी समितीकडे पाठविण्यात आल्याचेही बांदेकर यांनी सांगितले. त्यानंतर नगराध्यक्षांनी चौकशी तसेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे आणि प्रशासनामार्फत तक्रार दाखल झाल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
“बिल अद्याप अदा झालेले नाही”
“नगरपरिषद आणि सावंतवाडीच्या जनतेचे नुकसान होऊ नये, यासाठी वादग्रस्त बिल अदा होण्यापासून थांबवले आणि चौकशीची मागणी केली,” असा दावा बांदेकर यांनी केला आहे. आजपर्यंत संबंधित वादग्रस्त बिल अदा झालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आपल्या भूमिकेवरून विरोधकांकडून राजकीय आरोप केले जात असल्याचा आरोपही बांदेकर यांनी केला आहे. कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा न करता आपल्यावर आरोप करण्यात आल्याचे सांगत, आपण पारदर्शकपणे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.
“जनतेच्या हितासाठी काम सुरूच राहणार!”
सावंतवाडी नगरपरिषदेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली विकासात्मक कामांसाठी आपण कार्यरत असल्याचे बांदेकर यांनी म्हटले आहे. भाजपचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती व नगरसेवक सावंतवाडीच्या विकासासाठी काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत, “सावंतवाडीची जनता योग्य वेळी याला उत्तर देईल,” असेही श्री. बांदेकर यांनी म्हटले आहे.



