सावंतवाडी : काही नाती ही पद, प्रतिष्ठा आणि अधिकारांच्या पलीकडे जाऊन मनाच्या गाभाऱ्यात अढळ स्थान निर्माण करतात. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, जबाबदाऱ्यांचे क्षितिज विस्तारते; मात्र जिव्हाळ्याच्या नात्यांमधील प्रेमाचा ओलावा कधीच आटत नाही. अशाच बालपणापासून जपलेल्या स्नेहबंधांची सुंदर अनुभूती म्हणजे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक साहेब यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते!, अशी प्रांजळ भावना भाजप महाराष्ट्र राज्य युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी समर्थपणे सांभाळत असतानाही सर्वसामान्य माणसांमध्ये अगदी सहजतेने मिसळणारे, आपल्या साधेपणाने मने जिंकणारे आणि प्रेमाच्या शब्दांनी आपलेपणाची जाणीव करून देणारे श्रीपादजी नाईक साहेब यांचे व्यक्तिमत्त्व नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आमच्या परिवारावर मुलाप्रमाणे प्रेम करणारे, वेळोवेळी मायेची सावली देणारे आणि सदैव आशीर्वादांचा हात पाठीशी ठेवणारे ते आमच्यासाठी केवळ केंद्रीय मंत्री नसून एक जिव्हाळ्याचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या मंगलमय निमित्ताने प्रत्यक्ष भेट घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्याचा आनंद लाभला. या भेटीत केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण नव्हती, तर बालपणापासून मनात जपलेल्या प्रेमाच्या, विश्वासाच्या आणि आत्मीयतेच्या नात्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला, असेही युवा नेते विशाल परब यांनी म्हटले आहे.
पद मोठं झालं म्हणून माणूस मोठा होत नाही; तर मोठेपणाच्या शिखरावर पोहोचूनही माणुसकीची नाळ जपणारा माणूस खऱ्या अर्थाने मोठा ठरतो! श्रीपादजी नाईक साहेबांच्या साधेपणात, आपुलकीत आणि माणसांना जोडून ठेवणाऱ्या स्वभावात या मोठेपणाचे दर्शन घडते.
ईश्वरचरणी प्रार्थना की, श्रीपादजी नाईक साहेबांना उत्तम आरोग्य, निरोगी व दीर्घायुष्य लाभो! त्यांच्या हातून जनसेवेचे कार्य निरंतर घडत राहो आणि त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, यश व आनंदाची सदैव बरसात होत राहो, श्रीपादजी नाईक साहेब, आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!, आपुलकीचे ऋण शब्दांत व्यक्त करता येत नाही; कारण काही नाती ही काळाने नव्हे, तर हृदयाने जपलेली असतात! , अशा प्रकारे युवा नेते विशाल परब यांनी मनस्वी शुभेच्छा दिल्या आहेत.



