सावंतवाडी : जलसंधारणाला लोकसहभागाची भक्कम जोड देत ग्रामपंचायत शेर्लेच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या श्रमदान उपक्रमात बांधकाम विभागाचे प्रदीप पाटील, बांदा मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईंबर, सरपंच सौ. प्रांजल जाधव, माजी उपसरपंच दीपक नाईक, ग्रामपंचायत सदस्य बाळा शेर्लेकर, सचिन किनळेकर, श्रीमती जिन्नासा तारी, ग्रामपंचायत अधिकारी राजन नाईक यांच्यासह तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जगन्नाथ एकनाथ धुरी, सदस्य अनिल पिंगुळकर, लवू सावळ, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटांच्या सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा उभारल्याने परिसरातील पाणीसाठा वाढण्यास आणि भूजल पुनर्भरणास मोठी मदत होणार आहे. शासनाच्या योजनांसोबतच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी राहू शकतात, याचा आदर्श शेर्ले ग्रामस्थांनी या उपक्रमातून निर्माण केला आहे.
गावातील महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग हा या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. गावाच्या पाण्याचा प्रश्न गावकऱ्यांनीच हातात घेत सामूहिक श्रमातून जलसंवर्धनाचा संदेश दिला आहे.
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, महिला बचत गटांच्या सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांचे ग्रामपंचायत शेर्लेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.



