कोकणच्या लोककलेचा मुंबईत ‘सुवर्ण’ जल्लोष! ; श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या ‘समई नृत्या’ने मुंबई विद्यापीठात रचला इतिहास! ; ५९व्या युवा महोत्सवात सुवर्णपदकाची मानाची कमाई!

सावंतवाडी : कोकणच्या मातीत रुजलेली लोककला, विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांची जोड आणि कलाविष्कारातील आत्मविश्वासाच्या बळावर श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या लोकनृत्य संघाने मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या युवा महोत्सवात सुवर्णझळाळी मिळवली. दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागांतर्गत आयोजित अंतिम फेरीत महाविद्यालयाच्या संघाने लोकनृत्य स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली.

महाविद्यालयाच्या इतिहासात लोकनृत्य या कलाप्रकारात मुंबई विद्यापीठ स्तरावर प्रथमच सुवर्णपदक मिळविण्याचा मान या संघाने संपादन केला आहे. त्यामुळे या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला असून, कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची सुवर्णमुद्रा मुंबईच्या कलामंचावर उमटली आहे.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘समई नृत्य’ सादर केले. पारंपरिक लोककलेचा गंध, ताल-लय-ठेक्याचा सुरेख मिलाफ आणि नृत्याविष्कारातील कमालीचा समन्वय यामुळे या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक तसेच परीक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. कोकणातील ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी मुंबईसारख्या मोठ्या व्यासपीठावर केलेली ही कामगिरी त्यांच्या जिद्द, मेहनत, सातत्य आणि कलासाधनेची साक्ष देणारी ठरली.

या सुवर्ण कामगिरीमुळे संबंधित विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या संघात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या यशाला केवळ एका स्पर्धेतील विजय न मानता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेली मोठी ओळख म्हणून पाहिले जात आहे.

सुवर्णपदक विजेत्या संघात…

लोकनृत्य संघामध्ये प्राची प्रकाश करमळकर, सानिका संतोष गावकर, कीर्ती काशीराम गावडे, साक्षी अजित सावंत, गायत्री सदानंद राऊळ, योजना मनोज लोंढे, हर्षिता प्रवीण तारकर, वैष्णवी काशीराम गावडे आणि सोनाली कृष्णा जाधव यांनी सहभाग घेतला.

या नृत्याला गीतगायन व संगीताची साथ हर्षद रामकृष्ण तळवणकर, समर्थ संतोष गवंडी आणि प्रज्योत खडपकर यांनी दिली. तसेच प्रा. हर्षदा परब यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

संस्थेच्या वतीने अभिनंदन

या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले, कार्याध्यक्ष राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले, युवराज्ञी तथा नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शकांचे आणि सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

कोकणच्या मातीतून उमललेल्या लोककलेचा सुगंध थेट मुंबईच्या विद्यापीठीय मंचावर दरवळला आणि ‘समई’च्या प्रकाशात श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या यशाचा नवा अध्याय उजळून निघाला!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles