सावंतवाडी : माजगाव गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत तब्बल ४५ लाख रुपयांची विविध विकासात्मक कामे मंजूर झाली आहेत. जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाल्याबद्दल ग्रामसचिवालय माजगावच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
गावातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावणे, पायाभूत सुविधांना बळकटी देणे आणि ग्रामविकासाची वाट अधिक सुकर करणे या दृष्टीने या निधीला विशेष महत्त्व आहे. विकासकामांसाठी निधी मंजूर झाल्याने माजगावच्या विकासप्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याचे ग्रामपंचायतीकडून कौतुक!
माजगावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांबद्दल ग्रामपंचायतीने समाधान व्यक्त केले आहे. लोकप्रतिनिधींची कार्यतत्परता, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि गावाच्या गरजांबाबतची जाणीव यामुळे विकासकामांना चालना मिळत असल्याचे अभिनंदनपत्रात नमूद करण्यात आले आहे. यापुढेही अशाच प्रकारे लोकहिताची कामे सातत्याने घडत राहावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत माजगावच्या सरपंच श्रीमती रंजना रविंद्र कानसे यांनी विक्रांत सावंत यांना दिलेल्या अभिनंदनपत्रातून त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि माजगावमधील ग्रामस्थांच्या वतीनेही विकासकामांसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
माजगावच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या निधीमुळे गावातील विविध नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल, अशी आशा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.



