शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग खुला, बांद्यात ‘कृषकव्हेंचर’च्या नव्या कार्यालयाचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन! ; जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती., शेतमालाला योग्य बाजारपेठ, रास्त दर आणि आधुनिक कृषी मार्गदर्शनावर भर!

बांदा : शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल, घामाला समृद्धीचे फळ आणि कृषी उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळाली, तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने बळ मिळेल. शेतकऱ्यांच्या हाताला उत्पादनाचे सामर्थ्य आहे; मात्र त्या उत्पादनाला योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी सक्षम बाजारपेठ, आधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह मार्गदर्शनाची जोड आवश्यक आहे. हाच ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न होऊ शकतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.

बांदा येथे कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कंपनीने सातत्याने कार्यरत राहावे, त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून द्यावी आणि शेती व्यवसायाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

कृषकव्हेंचरच्या बांदा येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते फीत कापून, तर भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांसह बांदा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेतकऱ्यांच्या हिताचा ध्यास; कृषी समृद्धीचा विश्वास!

यावेळी भाजप युवा नेते विशाल परब यांनी कृषकव्हेंचरच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविणे, त्यांच्या उत्पादित मालाचे योग्य नियोजन करणे आणि बाजारपेठेत त्याला चांगला दर मिळवून देणे, या उद्देशाने दयानंद कुबल यांनी कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांना केवळ उत्पादनापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी सक्षम व्यवस्था निर्माण करणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे आणि शेतीतून अधिक चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी मदत करणे, या दृष्टीने कंपनीचे कार्य महत्त्वाचे आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू झालेला हा उपक्रम भविष्यात कोकणातील विविध भागांपर्यंत पोहोचेल आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असा विश्वासही विशाल परब यांनी व्यक्त केला.

बाजारपेठेपासून तंत्रज्ञानापर्यंत; शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी बहुआयामी प्रयत्न

शेतकऱ्यांनी राबराब राबून पिकविलेल्या कृषी उत्पादनाला योग्य भाव मिळणे, ही त्यांच्या आर्थिक उन्नतीची पहिली पायरी आहे. याच जाणिवेतून कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी, कृषी उत्पादनांसाठी सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला जाणार आहे.

यासोबतच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती, कृषीविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध शासकीय व कृषीपूरक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सहकार्य, गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा, रोपे आणि शेतीसाठी आवश्यक साधनांची उपलब्धता यांसारख्या बाबींवरही कंपनी लक्ष केंद्रित करणार आहे. कृषी उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे, उत्पादकतेत सुधारणा घडवून आणणे आणि शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हीदेखील कंपनीच्या कार्याची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे आहेत.

शेतकऱ्यांच्या कष्टांना योग्य मूल्य; समृद्ध कोकणाच्या दिशेने पाऊल!

शेतकरी, कृषी उत्पादक आणि बाजारपेठ यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाले, तर शेती व्यवसायाला नवी दिशा मिळू शकते. उत्पादित मालाच्या विक्रीतील अडचणी कमी करणे, बाजारपेठेतील संधींचा लाभ मिळवून देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पूरक व्यवस्था उभी करणे, या माध्यमातून कृषकव्हेंचरकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

बांदा परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील, तसेच आधुनिक कृषीविषयक माहिती आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा, उत्पादनाला योग्य भाव आणि शेतीला समृद्धीची नवी वाट मिळवून देण्याच्या दिशेने या कार्यालयाची सुरुवात महत्त्वपूर्ण ठरण्याची आशा आहे.

मान्यवरांची उपस्थिती –

या उद्घाटन सोहळ्याला सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, बांदा पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, तांबोळी पंचायत समिती सदस्या प्रियांका देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब, भाजप बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, वाफोलीचे उपसरपंच विनेश गवस, कासचे सरपंच प्रवीण पंडित, डिंगणेचे माजी उपसरपंच जयेश सावंत, समर्थ नर्सरीचे अर्जुन मोरजकर, प्रवीण देसाई यांच्यासह अन्य मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles