कणकवली महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा!

कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपाल श्री. विजय परब यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. वाय. व्ही. महालिंगे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना स्वप्ने पाहण्यास, वाचन करण्यास आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यास प्रेरित केले. पुस्तकांच्या सहवासातून ज्ञानाची समृद्धी होते, असेही त्यांनी सांगितले.
ग्रंथालय समितीचे प्रमुख व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. ज्याप्रमाणे माणसाला जगण्यासाठी अन्न आणि पाण्याची गरज असते, त्याचप्रमाणे बुद्धीच्या विकासासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. पुस्तकांच्या वाचनातून ज्ञानप्राप्ती होते, असे त्यांनी नमूद केले.
कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. माने यांनी ‘वाचा, वाचाल तर वाचाल’ हा संदेश दिला. IQAC समन्वयक डॉ. एस. टी. दिसले यांनी ‘ग्रंथ हेच आपले गुरु आणि खरे मित्र आहेत,’ असे सांगून डॉ. कलाम यांच्या शैक्षणिक जीवनातील प्रेरणादायी पैलू उलगडले व यशस्वी जीवनासाठी वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भावना सावंत यांनी केले. तनया नाईक यांनी आभार मानले, तर कु. रिया गावकर हिने समारोप केला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles