बॅडमिंटनच्या कोर्टवर मिलाग्रीसच्या शिलेदारांची दमदार बॅटिंग! ; जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यार्थिनीची रौप्य भरारी!, ग्लेन डिसिल्वा अन् अनय नाटलेकर यांची विभागीय स्तरावर झेप!

सावंतवाडी : क्रीडांगणावर जिद्दीचा हुंकार, रॅकेटच्या प्रत्येक फटक्यात कौशल्याची चमक आणि विजयासाठी अथक परिश्रमांची जोड… अशा दमदार खेळाच्या बळावर मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य यशाला गवसणी घातली, तर दोन विद्यार्थ्यांनी विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवत आपल्या क्रीडाकौशल्याची मोहोर उमटवली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थिनीने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला. प्रतिस्पर्ध्यांना चुरशीची लढत देत तिने आपल्या जिद्दीचे, चिकाटीचे आणि सरावातील सातत्याचे दर्शन घडवले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा यशात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

याच स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर शाळेचे विद्यार्थी ग्लेन एलेक्स डिसिल्वा आणि अनय गंगाराम नाटलेकर यांची १४ वर्षांखालील गटातील विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरावरून विभागीय स्तरापर्यंत झेप घेण्याची संधी मिळाल्याने या दोन्ही खेळाडूंच्या पुढील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे नियमित सराव, खेळाप्रती असलेली निष्ठा, मेहनत आणि मार्गदर्शनाचे मोलाचे योगदान आहे. अभ्यासाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केल्याने मिलाग्रीस हायस्कूलच्या शैक्षणिक व क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा मानबिंदू निर्माण झाला आहे.

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल रिचर्ड सालढाणा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मिलाग्रीसच्या या युवा बॅडमिंटनपटूंनी आपल्या कामगिरीतून विजयाची नवी उमेद जागवली असून, त्यांच्या पुढील क्रीडाप्रवासात यशाची अशीच उज्ज्वल मालिका कायम राहो, हीच अपेक्षा!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles