सावंतवाडी : दक्षिण कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेला सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रकल्प तब्बल ११ वर्षांनंतरही अपूर्ण असल्याने हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. निधीअभावी टर्मिनसचे काम रखडले असून, नव्या प्लॅटफॉर्मची उभारणी, लूपलाईन आणि पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पाईपलाईनचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस केवळ कागदावरच राहणार का, असा प्रश्न प्रवासी आणि टर्मिनसप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी करण्यात आले होते. मात्र, दशकाहून अधिक कालावधी उलटूनही या प्रकल्पाला अपेक्षित गती मिळालेली नाही. टर्मिनसच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ च्या उभारणीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून अद्याप निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या कामांच्या प्रत्यक्ष सुरुवातीबाबत अनिश्चितता कायम आहे.
पाहणी झाली, मात्र निर्णयाचे काय..?
सुमारे १५ दिवसांपूर्वी स्थानिक आमदार आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रस्तावित नवीन ट्रॅकच्या जागेची पाहणी केली होती. या पाहणीमुळे टर्मिनसच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, पाहणीनंतरही अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाल झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
पाणीपुरवठ्याचा प्रश्नही प्रलंबित –
टर्मिनसच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये पाणीपुरवठा हा महत्त्वाचा विषय आहे. मात्र, टर्मिनससाठी आवश्यक पाण्याच्या पाईपलाईनचे कामही अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. एकीकडे नवीन प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनची प्रतीक्षा, तर दुसरीकडे पाणीपुरवठ्याचे रखडलेले काम, यामुळे प्रकल्पाच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘लोकमान्य मधु दंडवते टर्मिनस’ नामकरणाची फाईलही प्रलंबित –
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते टर्मिनस’ असे नाव देण्याची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही. या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे टर्मिनसचा विकास आणि नामकरण या दोन्ही महत्त्वाच्या बाबींवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
निधी उपलब्ध करून कामे तातडीने सुरू करण्याची मागणी –
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच टर्मिनसप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे. केवळ पाहणी, चर्चा आणि आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५, लूपलाईन आणि पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच, रखडलेली कामे लवकरात लवकर सुरू करून सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



