सावंतवाडी : कोकणातील आरोग्यव्यवस्थेतील त्रुटी दूर करून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत उपचार मिळावेत, यासाठी शासनस्तरावरून ठोस पावले उचलली जाणार आहेत. डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी दीड हजार डॉक्टरांची भरती करण्यात येणार असून, या भरतीत कोकणाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर सावंतवाडीतील १०० बेडच्या सुसज्ज मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीसाठीही आवश्यक हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सावंतवाडीच्या आरोग्यसेवेला लवकरच नवी उभारी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) डॉ. स्वप्नील सांगळे यांनी व्यक्त केला.
आरोग्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार डॉ. सांगळे यांनी गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. सावंतवाडी तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचीही प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

आरोग्यमंत्र्यांचे आरोग्यव्यवस्थेवर संवेदनशील लक्ष!
जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्या केवळ कागदोपत्री नोंदवून न ठेवता त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना व्हाव्यात, या उद्देशाने आरोग्यमंत्र्यांनी आपल्याला जिल्ह्यात पाठविले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून समस्या समजून घेतल्या असून, तातडीने सोडवता येण्याजोग्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. उर्वरित प्रश्नांचा शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यावर कार्यवाही केली जाईल, असे डॉ. सांगळे यांनी स्पष्ट केले.
प्रसुती विभागापासून ब्लड बँकेपर्यंत प्रत्यक्ष पाहणी!
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभाग, अतिदक्षता विभाग (आयसीयू), रक्तपेढी, कॅज्युअल्टी विभाग, सीटी स्कॅन सेंटर यांसह विविध विभागांची डॉ. सांगळे यांनी पाहणी केली. या विभागांतील उपलब्ध सुविधा, आवश्यक मनुष्यबळ आणि प्रलंबित अडचणींची माहिती घेत त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी यांनी रुग्णालयातील विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याची मागणीही करण्यात आली.
रुग्णालयात विविध तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता असून ऑपरेशन थिएटरही सुसज्ज आहे. मात्र, प्रयोगशाळा तंत्रज्ञांसह काही पदांची आवश्यकता आहे. यातील काही पदे स्थानिक स्तरावर किंवा महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत भरता येऊ शकतात. इतर रिक्त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून तातडीने कार्यवाही केली जाईल, असे डॉ. सांगळे यांनी सांगितले.
दीड हजार डॉक्टरांची भरती; कोकणातील रुग्णसेवेला बळ!
डॉक्टरांची रिक्त पदे ही ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेसमोरील महत्त्वाची समस्या आहे. वर्ग तीनमधील बहुतांश पदे जवळपास भरलेली असली, तरी डॉक्टरांसह वर्ग चारमधील काही रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे. येत्या काळात दीड हजार डॉक्टरांची भरती होणार असून, त्यामध्ये कोकणाला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त डॉक्टर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे डॉ. सांगळे यांनी स्पष्ट केले.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार नीलेश राणे यांनी जिल्ह्यातील आरोग्यविषयक प्रश्नांवर लक्ष वेधले आहे. या सर्व प्रश्नांवर समन्वयाने काम करण्याची जबाबदारी आरोग्यमंत्र्यांनी आपल्यावर सोपविली असून, स्थानिक पातळीवरील उपाययोजनांची आखणी करण्यात आली आहे. मुंबईत परतल्यानंतर वरिष्ठ स्तरावर आवश्यक पाठपुरावा केला जाईल आणि या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्षात दिसतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
१०० बेडच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने!
सावंतवाडीच्या आरोग्यव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाबाबतही डॉ. सांगळे यांनी महत्त्वाची माहिती दिली. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न सुटला असून, निधी आणि मान्यतेची प्रक्रियाही पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी सध्या कार्यरत असलेल्या विभागांचे आणि तेथील सुविधांचे पर्यायी ठिकाणी स्थलांतर कसे करता येईल, याचा अभ्यास सुरू आहे. रुग्णसेवा विस्कळीत न होता बांधकामाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी योग्य पर्यायांचा विचार केला जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सावंतवाडीकरांना १०० बेडचे सुसज्ज मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असा विश्वास डॉ. सांगळे यांनी व्यक्त केला.
१५ दिवसांत काही सुविधा पूर्ववत करण्याच्या सूचना!
रुग्णालयातील स्वच्छतेच्या प्रश्नावरही डॉ. सांगळे यांनी लक्ष केंद्रित केले. संबंधित खासगी मालमत्तेतील स्वच्छतेची योग्य निगराणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने यासंदर्भात नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आयसीयू, रक्तपेढी आणि कॅज्युअल्टी विभागातील अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले. काही सुविधा येत्या १५ दिवसांत पूर्ववत करण्यासाठीही सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आरोग्याच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष कृतीचा विश्वास!
जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन पाहणी केल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी डॉ. स्वप्नील सांगळे यांचे आभार मानले. संपूर्ण मतदारसंघातील आरोग्यविषयक अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या असून, आगामी काळात या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सभापती सुस्मिता जाधव, आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखिल अवधूत, नगरसेवक बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, सुरज परब यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
डॉक्टरांची भरती, रिक्त पदांची पूर्तता, रुग्णालयातील सुविधांमध्ये सुधारणा आणि १०० बेडच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या दिशेने सुरू असलेली कार्यवाही यामुळे सावंतवाडीच्या आरोग्यसेवेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आता या आश्वासनांचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत कधी होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.



