सावंतवाडी : दीपावलीच्या उत्साहाला नरकासुर स्पर्धेच्या थराराची जोड देत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उद्या नरकासुरांचा महासंग्राम रंगणार आहे. वेत्ये येथील श्री कलेश्वर पूर्वी देवी युवा कला क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने भव्य खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी या स्पर्धेला पुरस्कृत केले आहे. सरपंच गुणाजी गावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री देव कलेश्वर व पूर्वी देवी यांच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ठीक ९ वाजता श्री काळेश्वर पूर्वी देवी मंदिर, वेटे येथे पार पडणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मर्यादित असलेल्या या स्पर्धेत विविध गावांतील नरकासुर पथके आपली कलात्मकता, कल्पकता, भव्यता आणि कौशल्याचे दर्शन घडविण्यास सज्ज झाली आहेत.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आयोजकांनी आकर्षक पारितोषिकांची घोषणा केली आहे. प्रथम क्रमांकासाठी १५ हजार ५५५ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ११ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी ७ हजार ७७७ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय विविध प्रकारची आकर्षक बक्षिसे आणि फनी गेम्सचेही आयोजन करण्यात आले आहे.
नरकासुराची भव्य प्रतिकृती, आकर्षक सजावट, पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांचा निनाद आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ही स्पर्धा दीपावलीच्या आनंदात आणखी रंगत भरणार आहे. केवळ स्पर्धा नव्हे, तर कोकणातील लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ठरणार आहे.
युवा शक्तीला प्रोत्साहन देत स्थानिक सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या भव्य स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि स्पर्धेचा आनंद लुटावा, असे नम्र आवाहन श्री काळेश्वर पूर्वी देवी युवा कला क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
एकूणच, नरकासुरांच्या कलात्मक आविष्कारातून कोण मारणार बाजी आणि कोण पटकावणार मानाचा किताब, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे!



