सावंतवाडी : मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगमंच खुणावतोय’ या विशेष कार्यक्रमाने नाट्यरसिकांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला. विविध नाटकांतील गाजलेली स्वगते, भावस्पर्शी संवाद आणि कलाकारांच्या दमदार अभिनयातून शिरोडा येथील र. ग. खटखटे ग्रंथालयाचा परिसर नाट्यमय वातावरणाने भारून गेला. साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग मासिक ७३ व्या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शब्दांकुर प्रोडक्शनचे कमलेश अणावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात आठ सदस्यांनी विविध नाटकांतील स्वगतांचा प्रभावी आविष्कार सादर केला. नाट्यसंवादांच्या माध्यमातून मानवी भावभावना, सामाजिक वास्तव आणि जीवनातील विविध पैलू उलगडत मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कमलेश अणावकर यांनी प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकातील स्वगत सादर करून केली. त्यानंतर प्रमोद जोशी लिखित ‘एका स्वप्नगर्भाचा मृत्यू’ या एकांकिकेतील प्रवेशही त्यांनी प्रभावीपणे सादर केला.
श्रद्धा राऊळ यांनी पु. ल. देशपांडे लिखित ‘सुंदर मी होणार’ या नाटकातील स्वगत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. पायल गावडे हिने बाबांच्या प्रेमाची भावनिक उकल करणारे हृदयस्पर्शी स्वगत सादर केले, तर सुप्रिया नाईक हिने शिक्षणविषयक स्वगताच्या माध्यमातून विचारांना चालना दिली.
युवा कलाकार राजेश मोंडकर यांनी विपुल महापुरुष लिखित ‘गेट वेल सून दामले’ या नाटकातील स्वगत दमदार अभिनयातून रंगवले. अष्टपैलू कलाकार रवी पणशीकर यांनी वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ या अजरामर नाटकातील दोन स्वगते सवेष सादर करत नाट्यरसिकांना मंत्रमुग्ध केले.
प्र. के. अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ या गाजलेल्या नाटकातील सरकारी वकिलाचे आक्षेप भालचंद्र दीक्षित यांनी प्रभावीपणे मांडले, तर लखोबा लोखंडेची कैफियत राजेश वैज यांनी उत्स्फूर्त अभिनयातून साकारली. प्रत्येक स्वगताने नाट्यकलेतील वेगवेगळ्या भावछटा आणि अभिनयाची ताकद अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे दिग्दर्शन करणाऱ्या कमलेश अणावकर यांनी वसंत कानेटकर लिखित ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकातील प्रवेश सादर करून या नाट्यमय सोहळ्याची संस्मरणीय सांगता केली.
कार्यक्रमातील कलाकारांचा उत्साह आणि कलाविष्कार गौरविण्यासाठी दिलीप पांढरे यांच्याकडून सर्व कलाकारांना २०२७ ची कालनिर्णय दिनदर्शिका भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले. ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या नाट्यमय मैफलीला अरुण धर्णे, सरोज रेडकर, नम्रता राय, अनिता सौदागर, एकनाथ शेटकर, विनायक उमर्ये, रामचंद्र बेहेरे, जयदीप देशपांडे, गीता धर्णे, तन्वी ओटवणेकर, प्रकाश मिसाळ, उदय पार्सेकर, प्रमोद पार्सेकर, भाग्यश्री मुद्रस, लीना परब, प्राची पालयेकर आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.
स्वगतांच्या शब्दांतून उमटलेली भावनांची स्पंदने, अभिनयातून साकारलेली जीवनाची विविध रूपे आणि रंगभूमीप्रती असलेली निष्ठा… ‘रंगमंच खुणावतोय’ या कार्यक्रमाने मराठी नाट्यपरंपरेचा जागर करत साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सांस्कृतिक वाटचालीत आणखी एक सुंदर अध्याय जोडला.



