बांदा : येथील नट वाचनालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अन्वर खान आणि शंकर नार्वेकर यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि न्यायाचा अधिकार दिला आहे. संविधानातील मूल्यांचे जतन करणे आणि त्यानुसार आचरण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे विचार यावेळी मांडण्यात आले.
नट वाचनालयाचे उपाध्यक्ष नीलेश मोरजकर यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, नागेश सावंत, गुरुनाथ नार्वेकर, सुधीर साटेलकर, अर्चना सावंत, श्रीपाद धरणगुती, शिवराम राऊळ, प्रवीण परब, लक्ष्मण पावसकर, अभिजीत पोरे, ग्रंथपाल सुस्मिता नाईक आदी उपस्थित होते. तसेच वाचनालयाचे वाचक, सभासद आणि कर्मचारी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.



