नितीन गावडे
सावंतवाडी : तालुक्यातील लोटांगणासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वार्षिक जत्रोत्सव कार्तिकी एकादशी, त्रिपुरी पौर्णिमेदरम्यान सुरु होतात. यापैकी मोठी जत्रा म्हणून सोनुर्ली येथील देवी माऊलीची जत्रा प्रसिद्ध आहे. देवीचे महात्म्य सातासमुद्रापार पोहोचले असून नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून माऊली चरणी दरवर्षी हजारो भाविक नतमस्तक होतात. आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी देवीकडे लोटांगणाचा नवस केला जातो. जत्रोत्सवादिवशी रात्री तो फेडला जातो. नवसकरी महिला उभ्याने मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून हा नवस फेडतात, तर पुरुष जमिनीवर लोटांगण घालून नवस फेडतात.
लोटांगण कार्यक्रम पाहण्यासाठी भक्त एकच गर्दी करतात. देवीच्या मंदिरासभोवती करण्यात आलेली विद्युत रोषणाई, लोटांगणाचा उत्सव आणि देवीचे सुखमय दर्शन डोळ्यात साठवून भाविक तृप्त होतात. दरवर्षी चार ते पाच हजार भाविक लोटांगण घालतात. जत्रोत्सवाला लोटणारी गर्दी पाहता, पोलीस प्रशासनाकडूनही योग्य पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. देवस्थान कमिटीकडून भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी योग्य नियोजन केले जाते.