कणकवली: “कोकणात स्पर्धा परीक्षांचे सकारात्मक वातावरण तयार झाले पाहिजे. कोणतीही भिती विद्यार्थ्यांनी मनात ठेवू नये. मात्र इयत्ता अकरावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करायला हवी तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो, ” असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी केले.
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रात श्री. रेडकर यांनी मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते सत्यवान रेडकर यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षाची तयारी करतानाचे स्वतःचे अनुभव कथन करून ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातून अत्यंत कष्टामध्ये प्रचंड मेहनत करून नऊ पदव्या मिळवल्या. त्यामुळे उच्च पदापर्यंत पोहोचता आले,’ असे त्यांनी सांगितले.
सत्यवान रेडकर हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दर शनिवार आणि रविवारी स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतात. कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत करिअर करावे हे त्यांचे स्वप्न असून त्यासाठी ‘तिमिरातून तेजाकडे’ ही शैक्षणिक चळवळ ते सातत्याने चालवत आहेत.
यावेळी श्री. रेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, स्टाफ सिलेक्शन, सीआयडी, एसआयडी , बीएसएफ, पोलीस भरती, प्राध्यापक, सीए , वर्ग दोन, वर्ग तीन अशा विविध क्षेत्रातील करिअरच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, याचा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, करिअर कट्टा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बी. एल. राठोड, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या समन्वयक नूतन घाडीगावकर, प्रा. अविनाश पोरे, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


