पर्थ : टीम इंडियाने पर्थमध्ये इतिहास घडवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी लोळवलं. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर तब्बल 295 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 238 धावांवर गुडघे टेकले. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियातील धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात हा विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयी सुरुवातीसह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तसेच जसप्रीत बुमराह याने या विजयासह कर्णधार म्हणून इतिहास घडवला आहे.
बुमराह दुसराच भारतीय कर्णधार –
जसप्रीत बुमराह कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देणारा दुसरा कर्णधार ठरला आहे. तर भारताला ऑस्ट्रेलियात पहिल्याच सामन्यात विजयी करणारा पहिला कर्णधार हा बहुमान अजिंक्य रहाणे याच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यात तत्कालिन कर्णधार विराट कोहली कौटुंबिक कारणामुळे मायदेशात परतला होता. तेव्हा रहाणेने भारताला विजयी केलं होतं. रहाणेने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये शतकी खेळीत करत भारताला जिंकवलं होतं. इतकंच नाही, तर रहाणेने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला 2-1 अशा फरकाने प्रतिष्ठेची बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका जिंकून दिली होती.
रोहितच्या अनुपस्थितीत बुमराहला संधी –
टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका सजदेह या दोघांना 15 नोव्हेंबरला पुत्ररत्न प्राप्त झालं. तर दुसरा सामना हा 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार होता. मात्र कुटुंबासह या आनंदाच्या क्षणी अधिक वेळ राहता यावं, यासाठी रोहितने पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार, असं बीसीसीआयला कळवलं होतं. त्यानंतर उपकर्णधार या नात्याने जसप्रीतला नेतृत्वाची सूत्रं देण्यात आली. बुमराहने ती जबाबदारी सार्थपणे पार पाडली आणि टीम इंडियाला विजयी सुरुवात करुन दिली.
दिग्गज कर्णधार अपयशी –
रहाणे आणि बुमराहने कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात जी कामगिरी केली, तसं दिग्गज माजी कर्णधारांनाही जमलं नाही. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि अनिल कुंबळे हे तिघे ऑस्ट्रेलियात कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात अपयशी ठरले होते.
बुमराह ‘मॅन ऑफ द मॅच’ –
दरम्यान जसप्रीत बुमराह याने पर्थ कसोटीत कर्णधारपदाच्या अतिरिक्त जबाबदारीसह अप्रतिम बॉलिंगही केली. बुमराहने एकूण 8 विकेट्स घेतल्या. बुमराहने त्यापैकी पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात 3 विकेट्स मिळवल्या. बुमराहला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं.