मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील महान कलाकार राज कपूर यांचा जनशताब्दी सोहळा नुकताच कपूर कुटुंबीयांकडून साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र आलं होतं. 13 ते 15 डिसेंबरदरम्यान राज कपूर फिल्म फेस्टिव्हलचंही आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सैफ अली खान आणि रणबीर कपूर या दोघांमध्ये काहीतरी बाचाबाची झाल्याचं पहायला मिळतंय. रेड कार्पेटवर संपूर्ण कपूर कुटुंबीय फोटोसाठी एकत्र पोझ देत होते, त्याचवेळी सैफ आणि रणबीर यांच्यात काही वाद झाल्याची चर्चा आहे.
रणबीर जेव्हा सैफ अली खानला स्क्रिनिंगच्या दिशेने जाण्याबद्दल काही सांगत असतो, तेव्हा सैफच्या चेहऱ्यावरील चिडचिड आणि राग स्पष्ट दिसून येते. यावेळी सैफ रणबीरला रागातच ‘ओके’ असं म्हणतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘सैफ हा खरा जेंटलमन आहे. मी त्याला वैयक्तिक भेटले होते आणि त्याच्याशी कोणीच अशा वाईट पद्धतीने बोलत नाही. रणबीरची इतकी हिंमत कशी झाली’, अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘प्रत्येक कुटुंबात भांडणं होतातच’, असं दुसऱ्याने म्हटलंय. याच व्हिडीओमध्ये आलियाच्या चेहऱ्यावरही तणावाचे भाव पाहून नेटकऱ्यांनी त्यावरही कमेंट्स केल्या आहेत.