सावंतवाडी : येथील बसस्थानक तसेच बाजारपेठेत मोक्याच्या ठीकाणी असलेली सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृहे महिलांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत. त्यांच्याकडून कोणतीही रक्कम आकारण्यात येऊ नये, हा सकारात्मक निर्णय घेतल्यास याचा राज्यातील गोरगरीब व गरजू महिलांना फायदा होईल, अशी मागणी सावंतवाडी भाजपच्या शहराध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर यांनी केली आहे.
लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेतून महायुती शासनाकडून नेहमीच महिलांचा सन्मान राखला, त्याला जोड म्हणून हा सकारात्मक निर्णय घेण्यात यावा असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत आपण लवकरच जिल्हाधिकारी अनिल पाटील व मंत्री नितेश राणे मंत्री यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधणार आहे असे त्यांनी सांगितले.
याबाबत सौ. मडगावकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे त्यात त्यांनी असे म्हटले आहे की ग्रामीण भागातून तसेच अन्य ठिकाणावरून व्यापार तसेच खरेदी करण्यासाठी शहरात येणाऱ्या महिलांची संख्या जास्त असते अत्यावश्यक प्रसंगी शौचालयात गेल्यानंतर तेथे पाच रुपये दर आकारला जातो मात्र अनेक वेळा सुट्ट्या पैशांची समस्या तर ग्रामीण भागातील काही गोरगरीब महिलांकडे पैसे नसतात त्यामुळे त्यांना शौचालय वापरणे परवडत नाही परिणामी आजाराला निमंत्रण ठरू शकते
ही सार्वजनिक शौचालय फक्त सर्वसामान्य गोरगरीब महिलांकडूनच वापरली जातात त्यामुळे त्यांची गरज लक्षात घेता त्या ठिकाणी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात यावी आणि या सेवेसाठी लागणारा भार प्रशासनाने किंवा शासनाने उचलावा जेणेकरून महिलांना मोफत सेवा मिळू शकते. सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याचा अनेक वेळा निदर्शनासहित आहे त्यामुळे ती स्वच्छ राहावीत व महिलांना चांगली सेवा मिळावी यासाठी आम्ही भाजपच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहोत असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.