सावंतवाडी : शहरातील आरपीडी ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारी संस्था आहे. प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अभिमान वाटला. शिक्षकांनी घडवलेली ही मूल भविष्यात निश्चित यशवंत होतील असे प्रतिपादन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी मार्चपूर्वी विशेष शिबीर घेऊन शाळेतच दाखल्यांचे वितरण करू असे श्री.पाटील यांनी जाहीर केले. तसेच ज्ञानदानासह संस्कार देण्याचं काम आमचे शिक्षक करत असून देश-विदेशासह मोठ्या पदांवर प्रशालेत घडलेले विद्यार्थी आहेत याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार विकास सावंत यांनी अध्यक्षीय मनोगत काढले. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ‘लोकगंध’ या स्नेहसंमेलनात ते बोलत होते.
शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे ‘लोकगंध’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या उपस्थितीत पार पडले. ईशस्तवन, स्वागत गीताने मान्यवरांच्ये स्वागत झाले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते’मानस’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तहसिलदार श्रीधर पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, खजिनदार सी. एल.नाईक आदी उपस्थित होते.
दरम्यान, शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचा आदर्श शिक्षक भुषण पुरस्कार प्राचार्य जगदीश धोंड तसेच माजी मुख्याध्यापक अरविंद साळगावकर यांना तहसीलदार श्री. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षकेत्तर पुरस्कारान आनंद म्हावळणकर यांचा सन्मान केला. माजी विद्यार्थींनी सीए अनन्या ठोंबरे हीचा विशेष सन्मान याप्रसंगी करण्यात आला. तसेच सहशालेय उपक्रमात चमकदार कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना तहसीलदा श्री. पाटील म्हणाले, शाळेचं नाव व कार्य जिल्ह्यात उज्वल आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारी ही संस्था आहे. आज माझ्या शाळेचे दिवस आठवले. माझे वडील शिक्षक असल्याने शिक्षणासह सहशालेय उपक्रमात भाग घेत इथपर्यंत पोहचलो अशा भावना व्यक्त केल्या. तसेच शाळेच्या ग्रंथालयाला १०० पुस्तक भेट स्वरूपात देणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, सावंतवाडीतील सर्वात सुंदर ठिकाण असणारी ही शाळा आहे. मैदानी खेळांसाठी सुविधा देण्याबाबत क्रीडा अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करणार आहे. तसेच शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दाखल्यांसाठी मार्च पूर्वी शाळेत विशेष शिबीर घेऊन त्यांना इथेच दाखल्यांचे वितरण देखील करू, महसूल प्रशासन म्हणून विद्यार्थ्यांना सहकार्य करू. माझं कार्यालय विद्यार्थांसाठी सदैव तत्पर राहील
असं तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात विकास सावंत म्हणाले, स्वतःचा वेळेचा सदुपयोग करून घ्या. माझ्यासाठी योग्य काय ? हे जाणा, त्यावेळीच तुमचं आयुष्य सुखकर होईल. गेली अनेक वर्षे प्रशालेचा निकाल १०० टक्के लागत आहे. आजही ती परंपरा कायम आहे. संस्थाचालक म्हणून याचा सार्थ अभिमान आहे. आमचे शिक्षक ज्ञानदानासह संस्कारही करतात.देश-विदेश,दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमचे विद्यार्थी पसरले आहेत. मोठं मोठ्या पदावर ते कार्यरत आहेत. देशाच्या राष्ट्रपतींचे उपप्रमुख देखील या शाळेचे विद्यार्थी होते. असे यशवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रशालेन केलं आहे. त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं म्हणून त्यांनी यशसंपादन केलं. हा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी पुढे जावं, सामाजिक बांधिलकी जोपासावी असं आवाहन श्री.सावंत यांनी केलं. आज कष्ट केलात तरच येणारे दिवस चांगले जातील असं मार्गदर्शन अध्यक्षीय मनोगतात त्यांनी केलं. प्रास्ताविक संप्रवी कशाळीकर, अहवाल वाचन डॉ. सुमेधा नाईक यांनी केल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलींद कासार तर आभार संजय पाटील यांनी मानले. याप्रसंगी संस्थेचे प्रा. सतीश बागवे, छाया सावंत, प्रा.बाळासाहेब नंदीहळ्ळी, संदीप राणे, चंद्रकांत सावंत, डॉ. नारायण देवकर, सौ. मुळीक, सोनाली सावंत, अँड. शामराव सावंत, श्री.पाटील, सौ. सावंत, अरविंद साळगावकर, श्री.धुरी, सतिश घोटगे, एस पी नाईक, बाळासाहेब पाटील, के टी परब, प्रल्हाद सावंत, प्राचार्य जगदीश धोंड मुख्याध्यापक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक संजय पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वनिता घोरपडे, मानसी नागवेकर, माया नाईक, जीएस भावेश सापळे, एलआर पुजा राठोड, सांस्कृतिक प्रमुख ओंकार चव्हाण, मुख्यमंत्री
शुभम वरक, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रांजली कबरे, सांस्कृतिक प्रमुख भक्ती रजपूत यांसह शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे संचालक, प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, स्नेहसंमेलनाच औचित्य साधून रंगावली प्रदर्शन भरविण्यात आले होते. या रंगावली प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज, डी.गुकेश तसेच स्त्रीयांवरील होणारे अत्याचार रंगावलीतून मांडण्यात आले. तसेच स्व. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, उद्योगपती रतन टाटा, उस्ताद झाकीर हुसेन यांना रंगावलीतून आदरांजली वाहण्यात आली. यात पूर्वा चांदरकर हीन प्रथम, द्वितीय आदित्य परब तर तृतीय क्रमांक सई कासकर हीन प्राप्त केला.