सावंतवाडी : आपल्या कोकणात पाहण्यासारखी अनेक निसर्गस्थळे, समुद्र, घाटमाथे आहेत, पण तरीही जगाच्या तुलने आपला कोकण विकासाच्या दृष्टीने मागेच आहे. कोकणला सुजलाम सुफलाम बनवणे हेच माझे ध्येय, धोरण आहे आणि ते गाठण्यासाठी आपल्या आशीर्वादांची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले.
श्री. परब हे तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावी शालान्त परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि एन. एम. एम. एस. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उद्योजिका सौ वेदिका परब, तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण पेडणेकर, संचालक रवींद्र परब, अशोक वराडकर, सुरेश गावडे, प्रा. दिलीप गोडकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा जाधव, विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती विदुल पाटकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीरा नाईक, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष गणपत पांढरे, माजी उपाध्यक्ष देवेश कावळे, संस्था सदस्य प्रसाद पेडणेकर, पालक शिक्षक संघाचे सदस्य समीर परब, उदय मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विशाल परब व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून झाले.
श्री. परब पुढे म्हणाले आज खाजगी शाळांचे महत्व वाढत असताना ग्रामीण भागातल्या या शाळेत विद्यार्थी संख्या टिकून येथील मुलांना उत्तमोत्तम शिक्षण देत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून रोजगारांच्या संधी असेल उपलब्ध करून दिल्या जातात. याबद्दल मुख्याध्यापक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
यावेळी बोलताना उद्योजिका सौ. वेदिका परब म्हणाल्या खाजगी शिक्षण व जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दिले जाणारे शिक्षण या दोन्ही मध्येही कुठेही तफावत नाही. उलट जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण घेऊन विशाल परब यांच्यासारखे असामान्य व्यक्तिमत्व घडले, म्हणून आपणही आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच घालण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बाळा जाधव, प्रा. दिलीप गोडकर, मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, माजी मुख्याध्यापिका श्रीमती पाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने विशाल परब व सौ. वेदिका परब यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी इयत्ता दहावी व बारावी शालान्त परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि एन. एम. एम. एस. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सिंधू टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद आडेलकर यांनी तर आभारप्रदर्शन दयानंद बांगर यांनी केले.