सावंतवाडी : येथील मुक्ताई ॲकेडेमीची साक्षी रामदुरकर हीने शालेय कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेली तीन वर्षे साक्षीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. साक्षीने शालेय आणि असोसिएशनच्या कॅरम व बुद्धिबळ स्पर्धांमध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर निर्विवाद यश मिळवले आहे. असा पराक्रम करणारी ती जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरली आहे. सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोंसले यांनी साक्षी आणि इतर विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
साक्षीसोबत मुक्ताई ॲकेडेमीचे सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, मालवण, दोडामार्ग येथील कॅरम व बुद्धिबळ खेळाडू यथार्थ डांगी, पार्थ गावकर, किमया केसरकर, गार्गी सावंत, अर्श पोटफोडे, सोनल मराठे, स्मित सावंत, आस्था लोंढे, रुद्र चव्हाण, गौरांगी परब, अनुजा सावंत इत्यादी सोळा विदयार्थी, विद्यार्थिनींची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. मागील दहा वर्षात ॲकेडमीत प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो विदयार्थ्यांमधील बारा विदयार्थी आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर तीस विद्यायार्थी पारितोषिक विजेते आहेत. राज्य स्तरावरील “बेस्ट ॲकेडमी” पुरस्कार मिळवणारी मुक्ताई ॲकेडेमी कोकणातील एकमेव ॲकेडमी आहे.