Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

गीतेच्या कर्मयोगातून शिवरायांनी निर्मिले हिंदवी स्वराज्य! : शिवव्याख्याते अँड. शिवाजी देसाई यांचे पारगड येथे प्रतिपादन.

सावंतवाडी : छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व हे संपूर्ण जगाला वंदनीय असे आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण करताना शिवरायांना असंख्य अडचणी आल्या. प्रचंड मोठे बलाढ्य शत्रू आजूबाजूला उभे असताना देखील शिवरायांनी हिंदवी स्वराज्यासाठी जी लढत दिली त्याची कीर्ती आणि इतिहास आज जागतिक स्तरावर मोठ्या पद्धतीने अभ्यासला जात आहे. छत्रपती शिवराय हे प्रत्येक भारतीयाचे आदर्श आहेत. भगवद्गीतेच्या कर्मयोगातन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, असे प्रतिपादन गोव्यातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचे भाचे अँड. शिवाजी देसाई यांनी महाराष्ट्र राज्यातील पारगड किल्ल्यावर भगवती देवीच्या सुप्रसिद्ध माघ (माही) पोर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित ‘छत्रपती शिवराय आणि आजचा समाज’ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना केले. याप्रसंगी विलास आडाव, विठ्ठल शिंदे, कान्होबा माळवे, शरद मालुसरे, धोंडीबा जांभळे, विश्वास आडाव आदी मान्यवर उपस्थित होते.

अँड. शिवाजी देसाई पुढे म्हणाले की मराठ्यांचा इतिहास जागतिक कीर्तीचा आहे परंतु असे असून देखील आज मराठ्यांना तो इतिहास वाचण्यात आणि इतिहास ऐकण्यासाठी वेळ नाही ही आपली प्रचंड मोठी शोकांतिका आहे. हिंदवी स्वराज्याची शपथ घेताना शिवरायांकडे साधन सुविधा कसल्याही प्रकारच्या नव्हत्या. त्यांच्यासोबत होते ते फक्त विश्वासू मावळे. त्यांचा स्वतःवरील विश्वास आणि त्यांच्या आई-वडिलांचा आशीर्वाद. एखादे ध्येय गाठताना अगोदर महत्त्वाचा असतो तो स्वतःवरील विश्वास आणि त्या ध्येयासाठी तयार करण्यात येणाऱ्या योजना. शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना आखलेली एकही योजना अपयशी ठरली नाही हे वास्तव आहे. त्यांनी स्वराज्याचे ध्येय बाळगताना स्वतःच्या प्रजेमध्ये अगोदर विश्वास निर्माण केला. आपल्या प्रजेला पाठबळ दिले. आज गोव्यामध्ये आम्ही नाणूस किल्ला चळवळ यशस्वी केली ती छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून. शिवचरित्रातून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि या प्रेरणेतूनच गोवा सरकारने सत्तरी तालुक्यातील ऐतिहासिक नाणूस किल्ल्यावर गोवा स्वातंत्र्यलढ्याचे क्रांतिवीर दिपाजी राणे यांना प्रत्येक २६ जानेवारीला मानवंदना देण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला.शिवरायांच्या चरित्रातूनच खरे म्हणजे भारत विश्व गुरु होणार आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. जमीन मापणीचे जनक, भारतीय लोकशाहीचे जनक हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आज घराघरांमध्ये छत्रपती शिवरायांच्या विचारांचे पारायण झाले पाहिजे. युवकांना छत्रपती शिवराय समजले पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये ईश्वर भक्ती हवीच परंतु त्या ईश्वर भक्ती बरोबरच कर्म प्रधानता देखील आवश्यकता आहे. ईश्वर फक्त मंदिरामपुरता मर्यादित नाही किंवा मूर्ती पूजेपुरता मर्यादित नाही. तो कणाकणात आहे. माणसाने स्वतःचे सामर्थ्य स्वतःच्या आत्म्याची शक्ती जाणून कर्म प्रधान ते मधून ईश्वर प्राप्ती केली पाहिजे. जी खरे म्हणजे छत्रपती शिवरायांनी केली असे अँड शिवाजी देसाई शेवटी म्हणाले. याप्रसंगी पारगड ग्रामस्थांच्या वतीने अँड. शिवाजी देसाई यांचा शाल श्रीफळ आणि मानाची टोपी देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles