मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला आहे. बुलडाणा इथले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते बुलडाण्याचे आमदार असा त्यांच्या राजकीय कारकिर्दीची वाढता आलेख आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राज्यातील काँग्रेसची धुरा देऊन काँग्रेसने आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद व पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते पद ही दोन्ही महत्त्वाची पदं यावेळी काँग्रेसनं विदर्भातील नेत्यांकडं सोपवली आहेत. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अवघ्या 16 जागांवर विजय मिळवता आला होता, तेव्हापासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजित कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावं चर्चेत होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या निवडीत धक्का देत चर्चेत नसलेल्या सपकाळ यांना या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्त केलं आहे. काँग्रेसचे सरचिटणीस खासदार के सी वेणुगोपाल यांनी सपकाळ आणि वडेट्टीवार यांच्या निवडीचं पत्र जाहीर केलं.
हर्षवर्धन सपकाळ यांनी 2014 ते 2019 पर्यंत बुलढाणा मतदार संघाचं प्रतिनिधित्त्व केलेले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. काँग्रेसच्या अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पात ते सक्रिय राहिले आहेत. गांधी घराण्याचे ते विश्वासू नेते आहेत. पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेसुद्धा ते सदस्य होते. राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विधिमंडळ पातळीवरसुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार अशी त्यांची ओळख आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात आदिवासीसाठी त्यांनी जिवनोत्थान कार्यक्रम राबवला. त्यानंतर ते आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. तर कमिशन न घेणारा आमदार अशी त्यांची क्लिन इमेज आहे.
ADVT –
सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.