Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

दिल्लीतील स्नेहभोजनाच्या माध्यमातून खासदारांची फोडाफोडी! ; ठाकरेंचे ४ खासदार गळाला?, आदित्य ठाकरेंची दिल्ली वारी.

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी नवी दिल्लीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार आणि तोंडभरून कौतुक केल्यानंतर ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. तरीही काल रात्री ठाकरे गटाच्या तिघा खासदारांनी शिंदे गटाच्या खासदारांच्या दिल्लीतील घरी जाऊन स्नेहभोजन घेतले. यामुळे अधिकच तणाव वाढल्यावर आदित्य ठाकरे यांनी फर्मान सोडले की, पक्षाला विचारल्याशिवाय भेटी घ्यायच्या नाहीत. पण हा आदेश आम्ही मानणार नाही, असे या खासदारांनी सरळ सांगितले असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पडद्यामागे नेमके काय शिजते आहे, याची खुमासदार चर्चा सुरू आहे.

ठाकरे गटातील एक खासदार एकनाथ शिंदेंच्या सत्काराला आणि खा. श्रीकांत शिंदे यांनी ठेवलेल्या भोजनाला उपस्थित होते. शिंदे गटाने ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाच्या 9 खासदारांना फोडणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच ही घडामोड घडल्याने त्याबाबत लगेच चर्चा सुरू झाली. त्यानंतर दिल्लीत गेलेले ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक घेऊन त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या, असा आदेशच काढला. परंतु स्नेहभोजनाला जाण्यासाठी परवानगीची गरज नाही, अशी प्रतिक्रिया या खासदारांनी दिल्याने ते ठाकरेंचा आदेश मानणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर स्नेहभोजनाच्या निमित्ताने शिंदे गट ठाकरे गटाच्या खासदारांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न यशस्वी झाल्यास तो ठाकरे गटासाठी मोठा धक्का असेल.

शिवसेना उबाठामध्ये ‘ऑपरेशन टायगर’ मुळे प्रचंड अस्वस्थता पसरली असून आपले खासदार दिल्लीतूनच परस्पर शिवसेनेत (शिंदे) जाऊ नये यासाठी शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी दिल्ली गाठल्याचे बोलले जात आहे. ठाकरे यांनी दाखवण्यापुरती राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. मात्र त्यांचा मुख्य उद्देश आपल्या ९ खासदारांना नियंत्रणात ठेवण्याचा होता. गुरुवारी दुपारी या खासदारांची बैठक घेत त्यांना ठाकरे यांच्याकडून दम वजा आवाहन करण्यात आल्याचे समजते. यामुळे शिवसेना खासदारांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेना उबाठाव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाच्या स्नेहभोजनासाठी किंवा अन्य वैयक्तिक समारंभासाठी जायचे असल्यास पक्षाची पूर्व परवानगी घेऊन जाणे तसेच पक्ष कार्यालयाशी संपर्कात राहण्याचा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिल्याचे कळते. शिवसेना (शिंदे) पक्षात शिवसेना उबाठाकडून ‘इनकमिंग’ वाढत असल्याने उबाठाचे धाबे दणाणले आहेत. गुरुवारी १३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला तर आणखी काही नेते ‘उबाठा’ला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारी आहेत.

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles