कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘ संविधान वाचवा, हे लोकनाट्य विभागीय उडान महोत्सवात प्रथम क्रमांक प्राप्त करून अव्वल ठरले.
मुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विभागीय पातळीवर आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने उडान सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा महोत्सव नुकताच स.ह. केळकर महाविद्यालय देवगड येथे पार पडला. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या स्पर्धेत कणकवली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले’ संविधान वाचवा, हे पथनाट्य लोकप्रिय ठरले.
या पथनाट्यात शुभम जाधव, शिवानी वर्दंम ,सर्वेश गोसावी, धनंजय कांबळे ,कांचन परुळेकर, ऐश्वर्या सावंत, श्रद्धा घाडीगावकर,लिजा जाधव, मयुरेश सापळे आणि साहिल मेस्त्री या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या पथनाट्याच्या माध्यमातून जातीयता, धार्मिकता, अन्याय न्याय व्यवस्था, दहशतवाद, अस्वच्छता, आणि विषमतेच्या विळख्यातून भारतीय संविधानाला सोडविणे आवश्यक असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
या या पथनाट्याच्या लेखिका आज्ञा कोयंडे असून दिग्दर्शन अभिषेक कोयंडे यांनी केले आहे.
या विद्यार्थ्यांना आजीवन अध्ययन विभागाचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र मुंबरकर विभाग प्रमुख प्रा. प्रियांका लोकरे – प्रभू, डॉ. सुरेश हुसे, प्रा. प्रवीण कडूकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थी कलावंतांचे अभिनंदन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. सौ. राजश्री साळुंखे, सचिव श्री विजयकुमार वळंजू,सर्व विश्वस्त, संस्था सदस्य आणि प्र.प्राचार्य युवराज महालिंगे यांनी अभिनंदन केले आहे.