राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार्‍या कळसूलकरचा विद्यार्थी अनंत चिंचकरचा भव्य सत्कार! ; सावंतवाडी शहरातून जंगी रॅलीने अनंतचे अभिनंदन!

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीचा विद्यार्थी आणि ५८ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC) विभागाचा अभिमान असलेल्या इयत्ता नववीतील विद्यार्थी सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याने राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपल्या शाळेचे, शहराचे, जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल केले होते. आज त्याचे जंगी स्वागत सावंतवाडीत करण्यात आले. प्रशालेत त्याचा भव्य सत्कार देखील संपन्न झाला.

दिल्ली येथे लेफ्टनंट जनरल गुरप्रीत सिंग यांच्या हस्ते सुवर्णपदकाचा वितरण सोहळा पार पडला होता. या अतुलनीय यशाबद्दल त्याचा गौरव करण्यासाठी कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय प्रशासनाकडून भव्य स्वागत करण्यात आले. हार अर्पण करून त्याचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रशालेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. गवळी तिठा येथून या मिरवणूकीस प्रारंभ झाला. यानंतर दीपकभाई केसरकर कार्यालय, श्रीराम वाचन मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक आणि बाजारपेठ या मार्गाने प्रशालेपर्यंत ही मिरवणूक पोहोचली. त्यानंतर प्रशालेच्या सभागृहात सार्जंट अनंत चिंचकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, एन.सी.सी चे श्री. गवस, श्री. बागुल, वैभव केंकरे, आदींसह सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles