- ✍️ रुपेश पाटील.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महायुतीत युती होणेबाबत प्रचंड घमासान सुरू आहे. अशाच परिस्थितीत महाविकास आघाडीतही सर्वकाही ठीक नसल्याचे चित्र आहे. कारण सावंतवाडी नगरपरिषदेत काँग्रेसला किमान 6 जागा मिळाल्या तरच महाविकास आघाडीत आमचा समावेश राहील, अशी स्पष्ट भूमिका महिला जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी घेतली आहे. तर महायुतीत महत्त्वाचा घटक असलेला अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदासह 20 ही जागांवर आपली दावेदारी पेश केली आहे. सद्यस्थितीत सावंतवाडी शहराचे एकूणच राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सद्यस्थितीत बोलणे टाळून मौन व्रत धारण केले आहे. ”आपल्याला महायुती होईल अशी अपेक्षा आहे”, एवढेच ते मत व्यक्त करत आहेत. मात्र त्यांची ही चुप्पी सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनाच भारी पडेल काय?, हे आगामी काळात नक्कीच ठरणार आहे. मात्र सद्यस्थितीत काल उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी स्वर्गीय आमदार जयानंद मठकर यांच्या स्नुषा व महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून सावंतवाडीकरांच्या सेवेत सदैव आपले योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सीमा मठकर यांनी माजी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ तसेच आपल्या सर्व उबाठासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे.


सावंतवाडी शहरातून अद्याप सर्वात आघाडीवर ठाकरेंच्या सेनेचेच पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. महायुती होणेबाबत नागरिकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर तिकडे अजितदादा गटाने देखील आपली स्वतंत्र तयारी केली आहे. सीमा मठकर यांच्यासाठी माजी आमदार तथा राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी देखील आपल्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. अशा एकूण परिस्थितीमध्ये कुठेतरी महायुतीला नक्कीच किंमत चुकवावी लागेल? अशी एकूण राजकीय परिस्थिती आहे. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ओरोस येथे घेऊन आपल्या वरिष्ठांकडे त्याचा अहवाल सादर केला आहे. मात्र शिंदे सेनेच्या बाबतीत जरी मुलाखती झाल्या असल्या तरी ज्या पद्धतीने राजकीय भूमिका स्पष्ट घ्यायला हवी तसेच चित्र पहावयास अद्यापही मिळाले नाही. या एकूण परिस्थितीत सद्यस्थितीत ठाकरेंच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर या मात्र सातत्याने शहर पिंजून काढत आहेत.
आता ‘रात्र थोडी सोंग फार!’ अशी परिस्थिती असताना जर ‘युती तुटली’ तर त्याची मोठी किंमत भाजप व शिंदेसेनेलाच चुकवावी लागेल, असे सुज्ञ सावंतवाडीकरांमध्ये बोलले जात आहे. ‘राजकारणात कधीच कोण कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो!’ हे आजपर्यंतचे सूत्र राहिले आहे. मात्र अद्यापही वेळ गेली नाही जर आज दिवसभरात ठोस निर्णय निघाला तर चांगलीच गोष्ट आहे. अन्यथा हे एकीकडे युतीबाबत वाट पाहात राहतील आणि कोणताही ठोस निर्णय घ्यायचा नाही, अशीच जर भूमिका राहिली तर ‘अब कया फायदा?, जब चिडीया चुब गई खेत?’ अशी वेळ येऊ शकते, ती येऊ नये ही अपेक्षा! मात्र जर महायुतीचे नेते आणि पदाधिकारी वेळीच सावध झाले नाही तर नक्कीच महायुती बॅक फुटवर जाणार आणि चमत्कार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आजच्या घडीला उबाठा सेनेकडून दमदार दावेदारी पेश केलेल्या सीमा मठकर यांचे पारडे नक्कीच जड आहे, असे मतदार मतदारांमध्ये बोलले जात आहे.
तूर्तास एवढेच, बघूया काय होते ते?


