भाजपची सत्ता असतानाही उपोषणाची वेळ!, संतोष गांवसांचा नगरपरिषद प्रशासनावर हल्लाबोल! ; “पालकमंत्र्यांनी सांगूनही कारवाई नाही!, मुख्याधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत!” ; लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे न घेण्याचा इशारा!

सावंतवाडी : नगरपरिषदेवर भाजपची सत्ता असतानाही नागरिकांना आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची खंत व्यक्त करत विशेष कार्यकारी अधिकारी संतोष गांवस यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला.

“मी गेली ४० वर्षे नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. मात्र, सध्या मुख्याधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. पालकमंत्र्यांनी सूचना करूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने अखेर उपोषणाचे हत्यार उपसावे लागले,” असा घणाघाती आरोप गांवस यांनी केला.

मयत आईच्या नावाने धोकादायक इमारतीची नोटीस! – गांवसांचा सवाल!

गांवस यांनी सांगितले की, आपल्या आईचे निधन होऊन अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नसताना नगरपरिषद प्रशासनाकडून त्यांच्या आईच्या नावाने इमारत धोकादायक असल्याची नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे नगरपरिषदेच्या असिसमेंटमध्ये भोगवटदार म्हणून असलेली आईच्या नावाची नोंद बदलून आपल्या नावाची नोंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

या मागणीसंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चाही झाली होती. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून विविध कारणे पुढे केली जात असल्याचा आरोप गांवस यांनी केला.

“नगरपरिषदेच्या चुकीच्या परवानगीमुळे अपघात; तरीही प्रशासनाची डोळेझाक!”

नगरपरिषदेने चुकीच्या पद्धतीने कामाला परवानगी दिल्याने झालेल्या अपघातानंतर आपल्या आईचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप गांवस यांनी केला. या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करूनही मुख्याधिकारी त्याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.

“तुम्ही पोलीस ठाण्यात जा,” असा सल्ला प्रशासनाकडून दिला जात असल्याचे सांगत गांवस यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका बाजूला मयत व्यक्तीच्या नावाने नोटिसा बजावल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला नाव बदलण्याच्या मागणीसाठी वेगवेगळी कारणे सांगितली जातात, हा विरोधाभासच असल्याचे त्यांनी नमूद केले.

लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच!

आपल्या मागणीबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून लेखी स्वरूपात आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका संतोष गांवस यांनी घेतली.

दरम्यान, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन गांवस यांच्याशी चर्चा केली. या प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच मुख्याधिकारी स्वतः आंदोलनस्थळी येऊन गांवस यांची भेट घेतील, असेही त्यांनी सांगितले.

आता नगरपरिषद प्रशासनाकडून नेमकी कोणती कार्यवाही होते आणि गांवस यांच्या मागणीवर तोडगा कधी निघतो, याकडे सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles