✍️ साबाजी परब.
बांदा : सध्या महाराष्ट्रात नगरपंचायत, नगरपरिषदा, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या देखील निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशावेळी प्रत्येक राजकीय महत्वाकांक्षा बाळगणारे व्यक्ती हे आपापल्या कार्याला घेऊन जनतेसमोर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतांचं दान मागण्यासाठी दारोदारी फिरणार आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील बांदा जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व राहिले आहे. बांदा ग्रामपंचायत देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर राजकीय सेवा देत आहे. सध्या “राजकारणातील चेहरो नयो, बदलासाठी ह्योच व्होयो!’ अशा स्वरूपाची युवकांमध्ये परिस्थिती आहे. बांदा जिल्हा परिषद गटातून नेतर्डे गावाचे सुपुत्र व सातत्याने विधायक उपक्रम आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कोकण कला व शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद कुबल हे देखील बांदा गटातून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. वरिष्ठ पातळीवर त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत तर राजकारणातील एक नवीन चेहरा म्हणून युवकांमध्ये त्यांनी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला, युवा वर्ग व विद्यार्थी तसेच वंचित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून दयानंद कुबल यांनी समाजसेवेचा आदर्श ठेवला आहे.
जनसेवेतून मिळणारा आनंद म्हणजेच खरा ‘दया’ –
“आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना अंतःकरणात जपणारे कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दयानंद कुबल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. वाढदिवस हा केवळ केक, गिफ्ट किंवा साजरेपणापुरता मर्यादित न ठेवता, समाजाच्या गरजा ओळखून सेवेचे व्रत घेत त्यांनी सातत्याने उपक्रम हाती घेतले.
त्यांच्या पुढाकारात संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ६७ युवकांनी रक्तदान केले, शेकडो रस्त्यावरील मुलांना अन्नदान करण्यात आले, तर ७५ दृष्टिहीन बांधवांना सफेद काठी वाटप करण्यात आली. याशिवाय पूरग्रस्त भागातील १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट, दोन शाळांना व्हाईट बोर्ड, तसेच २१ महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात आली. या उपक्रमांमुळे समाजातील अनेक घटकांना स्वाभिमानाने उभे राहण्याची संधी मिळाली. कार्यक्रमात स्वयंरोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात आला.
श्री. दयानंद कुबल यांनी गेल्या १५ वर्षांहून अधिक काळात सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत असून ग्रामीण विकास, अनाथ मुलांची काळजी, शिक्षण, आरोग्य, आदिवासी विकास, स्वच्छता आदी क्षेत्रांत त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
“दया ही केवळ नावात नसून कृतीतून ते समाजाला आनंद देण्याचे कार्य करतात,” असे उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करत राहण्याची प्रेरणा दयानंद कुबल यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे अनेकांना मिळत आहे.
त्यांच्या जनसेवेतील ‘दया’ खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
भारतीय जनता पार्टीकडून ते बांदा जिल्हा परिषद गटात राजकीय एन्ट्री करून समाजसेवा देण्यासाठी तत्पर आहेत. मात्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व याआधी जिल्हा परिषदेच्या सभापती पदी असलेले प्रमोद कामत हे देखील भारतीय जनता पार्टीतून इच्छुक आहेत. त्यांचेही स्थानिक नेते आणि राज्य स्तरावर नेतृत्व करणारे ‘राणे’ परिवाराशी निकटचे संबंध आहेत. तर महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यादेखील इच्छुक आहेत, अशा परिस्थितीत ‘तिकीट’ कोणाला मिळते? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
मात्र वरील नमूद केल्याप्रमाणे “राजकारणातील चेहरो नयो, बदलासाठी ह्योच व्होयो!’ अर्थातच ‘दया’ हा युवा चेहरा आणि नवा चेहरा या सूत्राप्रमाणे जर विचार झाला तर नक्कीच दयानंद कुबल हे सरस ठरतात. मात्र पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेतृत्व यांच्या निर्णयावर सारे काही अवलंबून आहे. बघूया काय होते?


