सावंतवाडी : तालुक्यातील वेर्ले गावात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सचिन मर्गज (वय ३५ वर्ष) हा युवक कोलगावातील दोन व्यक्तींसोबत शिकारीसाठी जंगल भागात गेला असता गोळी चुकून लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच मृत युवकाच्या वडिलांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोलगाव येथील सुप्रियान डांटस आणि त्याचा एक सहकारी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून घटनेबाबत चौकशी सुरू असून, गोळी कोणत्या परिस्थितीत सुटली? याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह सावंतवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सदर दुर्दैवी घटनेबाबत संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून सावंतवाडी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.


