तुझा खटाटोप कशासाठी? – डाॅ. रुपेश पाटकर यांची मनाला भिडणारी रचना.

🌹 तुझा खटाटोप कशासाठी? 🌹

त्याने विचारले,
तुझा खटाटोप कशासाठी?

मी म्हणालो,
‘प्रत्येक बाळ राम व्हावा,
आकाशीच्या चंद्रासाठी त्याने हट्ट करावा,
आरसा घेऊन सुमंताने चंद्र मुठीत मिळवून द्यावा!
आणि
एक दिवस उष्ट्या बोरांचा नैवेद्य खाण्याएवढा तो मोठा व्हावा!
यासाठी…

‘प्रत्येक बाळ कृष्ण व्हावा,
गाईसंगे गोकुळात पावा वाजवावा,
देवकी नसली तरी यशोदेचा लाडका व्हावा.
आणि
एक दिवस अर्जुनविषाद निरसण्याएवढा तो मोठा व्हावा!
यासाठी…

‘प्रत्येक बाळ गौतम व्हावा,
शुद्धोधनासारखा बाप मिळावा,
ऐषारामी जीवनातही दुखमुक्तीचा ध्यास लागावा.
आणि
एक दिवस करुणेच्या साक्षात्काराने गौतमाचा बुद्ध व्हावा!
यासाठी…

‘प्रत्येक बाळ ज्ञानोबा व्हावा,
त्याच्यासाठी मुक्ताईने ताटीचा अभंग गावा.
स्वतःचे पोरकेपण विसरून तो रेड्याचीही माऊली व्हावा!
आणि
एक दिवस भावार्थ दिपिका गाताना पसायदानाचा प्रसाद मागावा!
यासाठी…

प्रत्येक बाळ तुकोबा व्हावा,
वयाच्या विशीतच जीवनाचा मार्ग मिळावा.
विष्णुमय जगाच्या साक्षात्काराने भेदाभेद अमंगळ ठरावा.
आणि
एक दिवस ठामपणे रंजल्यागंजल्या सेवेचा त्याने धर्म जगावा!
यासाठी…
……
डाॅ. रुपेश पाटकर.
(उद्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षासाठी खूप सार्‍या शुभेच्छा!)

तुमची उद्याची सकाळ मंगलमय होवो!💐

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles