आजपासून सुरू होणाऱ्या २०२६ या नूतन वर्षाच्या तमाम वाचक, हितचिंतक तसेच मित्र परिवाराला हृदयपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!, हे नवीन वर्ष आपणास सुख-समृद्धी, भरभराटी आणि सर्वोत्तम आरोग्य प्रदान करो, हीच योगेश्वर चरणी प्रार्थना!

मित्रहो!, नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभे राहून जेव्हा आपण २०२५ कडे मागे वळून पाहतो तेव्हा मनात भावनांचा एक वेगळाच कल्लोळ उठतो. हे वर्ष काहींसाठी संधी घेऊन आलं, तर काहींसाठी संघर्षांची कठीण परीक्षा ठरलं. आपण समाज म्हणून काय जिंकलो आणि काय हरवलं?, हा प्रश्न विचारायलाच हवा.
एकीकडे तंत्रज्ञानाने आपली वाट आणखी सोपी केली. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी वेगवान झाल्या. शिक्षण, व्यवसाय, शासनव्यवस्था, संवाद. डिजिटल युगाने ग्रामीण ते शहरी अशा प्रत्येक कोपऱ्याला जोडण्याचा प्रयत्न केला. तरुणाईने नव्या कल्पनांना हात घातला, स्टार्टअप्स उभे राहिले, रोजगाराच्या नव्या शक्यता दिसायला लागल्या. हे वर्ष आपल्याला सांगून गेलं. “ज्ञान हीच खरी ताकद आहे.!”,
परंतु या सर्व वेगाबरोबर आपण काहीतरी गमावतही गेलो. नाती-संबंधांची ऊब कमी होत गेली, स्क्रीनच्या प्रकाशात चेहऱ्यांवरील हास्य फिकट झालं. स्पर्धा, स्वार्थ व तणाव यांच्या सावल्या गडद होत गेल्या. शेतकरी, कामगार, सामान्य माणूस हा महागाई आणि अनिश्चिततेच्या कचाट्यात सापडला. आपण विकास केला खरा पण मानवी संवेदना जपण्यात मात्र कुठेतरी कमी पडलो.
२०२५ ने आपल्याला अनेक धडे दिले. नैसर्गिक आपत्ती असोत, सामाजिक ताणतणाव असोत किंवा आर्थिक आव्हाने! या प्रत्येक प्रसंगाने सांगितले की एकट्याने नव्हे, तर एकत्र राहूनच संकटांचा सामना करता येतो. समाज, प्रशासन, माध्यमे आणि नागरिक सगळ्यांनी आपली जबाबदारी जाणून वागण्याची वेळ आता खरी आली आहे.
नवं वर्ष म्हणजे नवा संकल्प. चुका विसरण्यासाठी नाही तर त्यातून शिकण्यासाठी.
गरज आहे ती “सत्याला आधार देणाऱ्या पत्रकारितेची, प्रामाणिक नेतृत्वाची, संवेदनशील नागरिकांची,
आणि परस्परांवरच्या विश्वासाची!”
चला, २०२५ ने शिकवलेले धडे मनात साठवूया. जे गमावलं त्यातून शहाणपण घेऊया. जे कमावलं ते समाजासाठी वापरूया. आशा, धैर्य व जबाबदारी घेऊन नव्या वर्षाकडे पुढे जाऊया!
मंडळी, काळाच्या प्रवाहात आणखी एक वर्ष विरून गेले -२०२५.
मागे वळून पाहतो, तेव्हा मनात आनंदाचे दिवेही पेटतात अन् डोळ्यांत पाण्याची झुळूकही दाटून येते.
हे वर्ष आपल्याला सांगून गेलं – ‘जीवन म्हणजे मिळवण्याइतकंच, गमावण्याचंही नाव आहे.”
२०२५ ने आपल्याला ‘अभिमान’ दिला.
भारतीय महिला क्रिकेट संघाने जग जिंकून दाखवलं.
“स्वप्नं केवळ पुरुषांची नसतात!, संघर्ष करणाऱ्या मुलींचीही असतात!”
देशभरातील छोट्या-छोट्या मैदानांत खेळणाऱ्या हजारो मुलींना या विजयानं सांगितलं – “होय, माझ्यातही ताकद आहे, मीही करू शकते!”
पण याच वर्षाने आपल्याला मोठी पोकळीही दिली.
“ही-मॅन” म्हणून ओळखला जाणारा धर्मेंद्र. आपल्या पडद्यावरील नायक, भावना, विनम्रता आणि साधेपणाचं प्रतीक आपल्यातून निघून गेला.
आणि भारताच्या कलासृष्टीला एक मोठं ओझं देऊन शिल्पकार राम सुतारही आपल्यातून दूर गेले.
ज्यांच्या हातांनी इतिहास घडवला, पुतळ्यांतून विचार जागे केले,
त्या हातांची ऊब आता केवळ स्मृतीत उरली.
एका बाजूला विजयाचा जल्लोष तर दुसऱ्या बाजूला निरोपाची वेदना!
याच दोन टोकांवर आपण २०२५ पार केलं.
महागाईची झळ, शेतकऱ्यांच्या चिंता, तरुणांच्या नोकरीची वाट पाहणी,
नैसर्गिक आपत्तींची सावली, या सगळ्यांनी आपल्याला प्रश्न विचारला
“आपण खऱ्या अर्थानं पुढे जातोय का?”
आणि तरीही… या काळोखातही काही दिवे सतत पेटत राहिले.,
माणुसकी, परस्परांची मदत, समाजातील संवेदनशील हात, आणि आशेचा छोटासा पण जिद्दी प्रकाश.!
२०२५ हे वर्ष आपल्याला एकच धडा देऊन गेलं – “जिंकताना नम्र रहा आणि हारताना तुटू नका.!”
जे गमावलं त्यातून शिकू या.
जे कमावलं – ते समाजासाठी वापरू या.
एकमेकांना धरून पुढे चालू या!, कारण भविष्य एकट्याचं नसतं,
ते सगळ्यांचं असतं.
नवं वर्ष – नवा संकल्प –
”सत्य, संवेदना आणि जबाबदारी” – हीच आपली खरी शक्ती!
पुनश्च एकदा नव्या वर्षाच्या हृदयपूर्वक शुभकामना!
💥आपलाचं हितचिंतक💥
✍️रूपेश पाटील✍️


