”सॉरी आय लव यू मॉम – डॅड!” – हातावर संदेश लिहून २१ वर्षीय युवतीची आत्महत्या.

✍️ विजय चव्हाण. (नाशिक प्रतिनिधी)

नाशिक : शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, 21 वर्षीय दिव्यांग तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. दीक्षा त्रिभुवन असे या मृत तरुणीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी दीक्षाने आपल्या हातावर आई-वडिलांसाठी भावनिक संदेश लिहिल्याने ही घटना अधिकच हेलावून टाकणारी ठरली आहे.

जन्मजात दिव्यांग असलेल्या दीक्षाने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे नाशिक शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे. स्वभावाने शांत, मिळनसार आणि आनंदी असलेल्या दीक्षाच्या अचानक जाण्याने त्रिभुवन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमके काय घडले?

ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. नाशिक शहरातील एका दिव्यांग विद्यालयात शिक्षण घेणारी दीक्षा घरी एकटी असताना तिने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने घरातील सदस्यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा त्यांनी तातडीने तिला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही बातमी कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. ज्या मुलीवर कुटुंबाच्या आशा टिकून होत्या, ती अशा प्रकारे आयुष्य संपवेल, याची कल्पनाही पालकांना नव्हती.

हातावर लिहिलेल्या शेवटचा भावुक संदेश –
शवविच्छेदनादरम्यान दीक्षाच्या हाताच्या तळव्यावर एक भावनिक संदेश लिहिलेला आढळून आला आहे. ”सॉरी आय लव यू मॉम डॅड!’ असे शब्द तिने लिहिले होते. आई – वडिलांची माफी मागत दीक्षाने आयुष्य संपवले ही बाब पोलिसांनाही भावुक करणारी ठरली आहे.

दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप आत्महत्येचे ठोस कारण समोर आलेले नाही.

दीक्षा कायम आनंदी असल्याने आणि तिची कोणतीही तक्रार नसल्यामुळे हे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. पोलीस तिच्या शाळा, मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांकडून माहिती घेऊन सखोल चौकशी करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, त्रिभुवन कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles