मुंबई : कर्तव्याच्या वाटेवर प्रामाणिकपणाची मशाल हाती घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. रस्त्यावर सापडलेल्या मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम स्वतःकडे न ठेवता ती प्रामाणिकपणे पोलिसांच्या ताब्यात देऊन संबंधित मालकाला परत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पायधुनी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अनिल सुदाम पाटील यांनी कर्तव्यनिष्ठेचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
![]()
पोलीस शिपाई क्रमांक ०९२५१७ अनिल सुदाम पाटील हे पायधुनी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना कालबादेवी रोड परिसरातील एका कपड्याच्या दुकानासमोर रस्त्याच्या कडेला एक पिशवी पडलेली आढळून आली. त्यांनी ती पिशवी तपासून पाहिली असता, त्यामध्ये अंदाजे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच दोन हजार रुपये रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले.
सोन्याचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम हाती लागल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा मोह न बाळगता श्री. पाटील यांनी आपल्या प्रामाणिकपणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी सदर मुद्देमाल एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात नेऊन तेथील ड्युटी ऑफिसर पीएसआय जगताप मॅडम यांच्या ताब्यात सुपूर्द केला. त्यानंतर संबंधित मुद्देमालाच्या मालकाचा शोध घेऊन तो त्याच्या स्वाधीन करण्यात आला.
सोन्याच्या दागिन्यांपेक्षाही प्रामाणिकपणाचे मोल मोठे!
आजच्या काळात मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर त्यावरील मोह टाळून ती वस्तू योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणे, हीच खऱ्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे. पोलीस शिपाई अनिल सुदाम पाटील यांनी आपल्या कृतीतून ही कसोटी यशस्वीपणे पार केली आहे. त्यांची ही कामगिरी केवळ एका नागरिकाला त्याची हरवलेली संपत्ती परत मिळवून देणारी नसून, पोलीस दलाविषयी जनतेच्या मनात विश्वास, आदर आणि सुरक्षिततेची भावना दृढ करणारी आहे.
त्यांच्या या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कामगिरीची दखल घेत पायधुनी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त मॅडम यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. त्यांच्या या कृतीतून पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, सचोटी आणि जनसेवेची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
वर्दीचा मान केवळ अधिकारात नसतो, तर तो प्रामाणिक कृतीतून उंचावतो! पोलीस शिपाई अनिल सुदाम पाटील यांनी आपल्या कार्यातून हेच सिद्ध केले आहे. त्यांची ही आदर्शवत कामगिरी निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी असून, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवा हीच पोलीस दलाची खरी ओळख! या मूल्यांना अधोरेखित करणारी आहे.




