स्त्रीशक्तीचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव! – तुळसमध्ये १०० महिलांचा ‘नारी सन्मान’ सोहळा दिमाखात! ; महिला लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याचा गौरव!, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसचा स्तुत्य उपक्रम.

वेंगुर्ला : समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला सन्मानाची सलामी देत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘नारी सन्मान सोहळा’ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात मठ, तुळस, होडावडे, पाल आणि मातोंड या पाच गावांतील तब्बल १०० महिलांचा मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. महिला लोकप्रतिनिधींसह अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कार्याची दखल घेणारा हा उपक्रम स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा ठरला.

तुळस येथील कर्मयोगी रामभाऊ तुळसकर स्मृती सभागृहात आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सरपंच रश्मी परब, कावेरी गावडे, रुपाली नाईक, रसिका केळुसकर आणि डॉ. विवेक चव्हाण यांचीही यावेळी उपस्थिती होती.

गावाच्या विकासात स्त्रीशक्तीचा मोलाचा वाटा!

ग्रामीण विकासाच्या वाटचालीत महिला लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर बालसंगोपन, पोषण, आरोग्यविषयक जागृती आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस या समाजाच्या भविष्याची पायाभरणी करतात. त्यांच्या या निःस्वार्थ, समर्पित आणि समाजाभिमुख कार्याला व्यासपीठ मिळवून देत वेताळ प्रतिष्ठानने महिला सन्मानाची परंपरा अधिक बळकट केली.

प्रमुख वक्त्या प्रगती विवेक चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिलांच्या कार्याचा गौरव म्हणजे केवळ त्यांच्या योगदानाची दखल नव्हे, तर त्यांच्या कष्टांना, समर्पणाला आणि सामाजिक बांधिलकीला दिलेली आदराची पावती असल्याचा भाव या सोहळ्यातून अधोरेखित झाला.

सन्मानातून प्रेरणेची नवी ज्योत!

वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन वासुदेव परुळकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली. शैलजा परूळकर यांनी आभार मानले. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी महेश राऊळ, माधव तुळसकर, विवेक तिरोडकर, डॉ. गोविंद धुरी, रोहन राऊळ, नाना राऊळ, प्रसाद भणगे, सानिया वराडकर, वैष्णवी परूळकर, निकिता कबरे, भूमी परूळकर आणि भार्गवी परूळकर यांनी सहकार्य केले.

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम, त्यांच्या योगदानाला मानाचा मुजरा आणि त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणेची नवी दिशा देणारा हा ‘नारी सन्मान सोहळा’ पाच गावांतील स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा संस्मरणीय उत्सव ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles