आई – मुलाचे मृतदेह एकमेकांचे हात बांधलेल्या अवस्थेत आढळले! ; सातार्डा-रायाचेपेड येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना.

सावंतवाडी : नियतीच्या फेऱ्यात अडकलेल्या दोन जीवांचा तेरेखोल नदीच्या पात्रात दुर्दैवी अंत झाला आणि सातार्डा परिसरावर शोककळा पसरली. सातार्डा-रायाचेपेड येथे राहणाऱ्या मायलेकाने घरापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर असलेल्या तेरेखोल नदीपात्रात शनिवारी रात्री उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. रविवारी नदीकाठावर त्यांचे चप्पल आणि बॅटरी आढळल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. एकमेकांच्या हातांना दोरीने बांधलेल्या अवस्थेत या दोघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरातील नागरिकही सुन्न झाले. ऑनलाइन गेमिंगसाठी घेतलेल्या कर्जाचा वाढता बोजा आणि त्यातून निर्माण झालेल्या तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर (वय ६३) आणि तुकाराम ऊर्फ सुहास श्यामसुंदर आरोंदेकर (वय २७) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. आई आणि मुलगा दोघेही एकत्र राहत होते. त्यांच्या पश्चात जवळचे कोणीही नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे सातार्डा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका कुटुंबाचा जीवनप्रवास अशा प्रकारे संपल्याने सर्वत्र शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

नदीकाठावरील चप्पल-बॅटरीने दिला घटनेचा धागा!

शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेचा उलगडा रविवारी झाला. नदीपात्राच्या काठावर चप्पल आणि बॅटरी आढळून आल्याने ग्रामस्थांना संशय आला. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सातार्डा दूरक्षेत्राचे पोलीस नागनाथ टक्केकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गोवा पोलीस आणि सावंतवाडी पोलिसांनी सुरुवातीला बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात शोधमोहीम राबविली. मात्र, मृतदेह पाण्याच्या आत असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. दुपारपर्यंत रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल न झाल्याने मृतदेह बाहेर काढण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले.

ग्रामस्थांच्या प्रयत्नांना अखेर यश.

शोधमोहीम सुरू असतानाच स्थानिक ग्रामस्थ राऊळ यांनी ज्या ठिकाणी मायलेकाने नदीत उडी घेतल्याचा अंदाज होता, त्या ठिकाणी गळ टाकून शोध घेण्यास सुरुवात केली. या प्रयत्नांना यश आले आणि दोन्ही मृतदेह गळाला लागले. एकमेकांचे हात दोरीने बांधलेल्या अवस्थेत असलेले मृतदेह रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.

यानंतर दोन्ही मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या शोधकार्यात पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

घटनास्थळी पोलीस पाटील विनिता मयेकर, सातोसेचे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये आणि सरपंच संदीप प्रभू यांनी भेट देऊन मदतकार्यात सहकार्य केले.

ऑनलाइन गेमिंगचे कर्ज ठरले तणावाचे कारण?

या घटनेमागील संभाव्य कारणाचा पोलीस तपास करीत आहेत. सुहास याने ऑनलाइन गेमिंगसाठी मोबाईलवरून कर्ज घेतले होते. या कर्जाची रक्कम वाढत गेल्याने तो आर्थिक तणावाखाली होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच तणावातून मायलेकाने टोकाचा निर्णय घेतला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेमागील नेमकी कारणे तपासातूनच स्पष्ट होणार आहेत.

या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

कर्जाच्या विळख्याने हिरावले दोन जीव; परिसरात हळहळ…

आर्थिक अडचणींचा वाढता ताण, ऑनलाइन गेमिंगच्या आहारी जाण्याचे संभाव्य धोके आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक घालमेल यांचे गांभीर्य या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. मात्र, या मायलेकांच्या मृत्यूमागील परिस्थिती आणि कारणांचा अंतिम निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

तेरेखोलच्या पात्रात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सातार्डा-रायाचेपेड परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. कालपर्यंत आपल्या घरात राहणारे मायलेक आज काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात शोक व्यक्त होत आहे. या घटनेने अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला आहे—आर्थिक संकटाच्या अंधारात माणसाला जगण्याचा आधार देणारी मदतीची हात पुढे येण्याची व्यवस्था अधिक सक्षम होणे किती गरजेचे आहे!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles