कॅरमच्या पटावर साक्षीची विजयी मोहोर!, मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर तालुकास्तरीय स्पर्धेत अव्वल! ; सलग पाच वर्षे जिल्हास्तरीय निवडीचा मान!, राज्यस्तरीय कॅरमसह राष्ट्रीय स्तरावरही साक्षीच्या गुणवत्तेचा ठसा!

सावंतवाडी : जिद्दीच्या बळावर कौशल्याला धार मिळाली आणि सातत्यपूर्ण सरावातून यशाने तिच्या गळ्यात विजयाची माळ घातली! कॅरमच्या पटावर आपल्या अचूक चालींनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत मुक्ताई ॲकेडमीची चौदा वर्षीय गुणवान खेळाडू साक्षी रामदुरकर हिने शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत मुलींच्या १७ वर्षांखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकावत आपल्या यशाचा झेंडा दिमाखात फडकवला. तिच्या या देदीप्यमान कामगिरीने मुक्ताई ॲकेडमीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत साक्षीने आपल्या खेळातील कौशल्य, एकाग्रता, अचूकता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अव्वल स्थान पटकावले. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांपासून कॅरमच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करत तिने सलग पाच वर्षे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान मिळवला आहे.

साक्षीच्या यशाची झेप केवळ तालुका आणि जिल्हास्तरापुरती मर्यादित राहिलेली नाही. शालेय कॅरम स्पर्धांबरोबरच महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनच्या स्पर्धांमध्येही तिने आपल्या खेळाचा ठसा उमटवला असून, राष्ट्रीय स्तरावर निवडीचा बहुमान मिळवला आहे. सातत्य, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यांच्या त्रिवेणी संगमातून साकारलेली तिची ही यशोगाथा नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाचा यशस्वी ठसा!

मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीची विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी सलग पाच वर्षे, तर राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी सलग चार वर्षे निवड झाली आहे. या दोन्ही क्रीडाप्रकारांत सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणारी ती कोकणातील एकमेव विद्यार्थिनी असल्याचे ॲकेडमीकडून नमूद करण्यात आले आहे.

मुक्ताई ॲकेडमीच्या खेळाडूंचीही चमकदार कामगिरी!

या स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या स्मित सावंत, हर्ष राऊळ, चिदानंद रेडकर आणि जयेश जाधव या विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवत आपल्या खेळातील गुणवत्ता सिद्ध केली. स्मितसोबत पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळपटू हर्ष राऊळ आणि चिदानंद रेडकर यांनी प्रत्येकी तीन प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. त्यांच्या या कामगिरीमुळे ॲकेडमीच्या खेळाडूंमधील गुणवत्ता आणि क्रीडाक्षेत्रातील प्रगती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दहा वर्षांची क्रीडासाधना – राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर यशाची पताका!

मुक्ताई ॲकेडमीने गेल्या दहा वर्षांत क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली ॲकेडमीच्या तीन विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावर, तर सोळा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. योग्य प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि खेळाडूंमधील सुप्त गुणांना वाव देण्याच्या प्रयत्नांतून ॲकेडमीने क्रीडाक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

साक्षी रामदुरकर हिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुक्ताई ॲकेडमीच्या सरचिटणीस सौ. स्नेहा पेडणेकर आणि कोषाध्यक्ष बाळकृष्ण पेडणेकर यांनी साक्षीचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles