दोडामार्ग : दिनांक ११ मार्च २०२६ रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत अभय केंद्र दोडामार्ग यांच्या वतीने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोडामार्ग शहरामध्ये बाईक रॅली काढून नागरिकांमध्ये मुलींच्या शिक्षण व संरक्षणाबाबत जागृती करण्यात आली.
या रॅलीची सुरुवात दोडामार्ग येथील तहसीलदार कार्यालयापासून करण्यात आली असून ती पंचायत समिती कार्यालय दोडामार्ग येथे समाप्त झाली. रॅलीदरम्यान ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले तसेच मुलींच्या शिक्षण, सन्मान आणि सुरक्षिततेबाबत संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला पंचायत समिती दोडामार्गच्या सभापती श्रीम. पार्वती गवस, तालुका संरक्षण अधिकारी पुरुषोत्तम पाटील, दोडामार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच जिल्हा महिला व बालविकास विभाग सिंधुदुर्गचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जनजागृती रॅलीमुळे समाजामध्ये मुलींच्या शिक्षण आणि संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अभय केंद्र दोडामार्ग यांच्या वतीने करण्यात आले होते.



