कोकण एनजीओच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! ; ‘वॉश लीडरशिप’ पुरस्काराने सन्मानित!

मुंबई : कोकण कला व  संस्था (कोकण एनजीओ इंडिया) या सामाजिक संस्थेला स्वच्छ पाणी व आरोग्यदायी उपाययोजनांसाठी दिला जाणारा यंदाचा वॉश लीडरशिप पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार १४ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील नामांकित पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लू येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने हा सन्मान योगिता निजामकर आणि साक्षी पोटे यांनी स्वीकारला.

संस्थेच्या स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. नेशनल फेदर अवॉर्ड या संस्थेच्या वतीने हा सन्मान देण्यात आला.

कोकण एनजीओ इंडिया ही संस्था महाराष्ट्रातील ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विविध क्षेत्रात सातत्याने काम करत आहे. संस्थेमार्फत आतापर्यंत २०० पेक्षा अधिक वॉटर फिल्टर गरजू शाळांना वितरित करण्यात आले आहेत. तसेच गेल्या दोन वर्षांत १४ शाळांमध्ये शौचालय व लघुशौचालयाच्या सुविधा उभारून विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आले आहे. विशेषतः आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे प्रयत्न उल्लेखनीय ठरत आहेत.

याशिवाय संस्थेमार्फत स्वच्छता जनजागृती अभियान, आरोग्य तपासणी शिबिरे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण, महिला व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य व स्वच्छता मार्गदर्शन, वृक्षारोपण मोहिमा, जलसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवले जात आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छता व्यवस्थापन, पाण्याचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे कार्यही संस्था सातत्याने करत आहे.

तसेच अनेक गावांमध्ये समुदाय सहभागातून स्वच्छता मोहीम, ग्रामविकास कार्यक्रम, महिला सक्षमीकरण, मुलांसाठी वसतिगृहे, धरणे व नदी स्वच्छता मोहीम तसेच पाणी बचत अभियान राबवून स्थानिक नागरिकांनाही या कार्यात सहभागी करून घेतले आहे. समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा संस्थेचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

कोकण एनजीओ इंडियाला यापूर्वी चार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले असून वॉश लीडरशिप पुरस्कार हा संस्थेचा पाचवा राष्ट्रीय सन्मान ठरला आहे. हा पुरस्कार संस्थेच्या सर्व देणगीदार, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांच्या मेहनतीचे फळ असून या सर्वाचे आपण ऋणी असल्याची भावना संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles