विद्यार्थिनींनी विविध कर्तबगार महिलांच्या भूमिका साकारत जिंकली मने! ; कास जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ चा महिला दिनी स्तुत्य उपक्रम.

सावंतवाडी :  तालुक्यातील कास येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विविध कर्तबगार महिलांच्या सुंदर वेशभूषा आणि व्यक्तिरेखा साकारून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
या उपक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा गोठोस्कर यांनी केले. तसेच शिक्षक श्री प्रशांत मडगावकर, श्री राजेंद्र शिरोडकर आणि श्री प्रसाद देसाई यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन व सहकार्य केले. कार्यक्रमाचे इंग्रजीतून उत्कृष्ट सूत्रसंचालन विद्यार्थिनी वैष्णवी कासकर हिने केले.
यावेळी विद्यार्थिनींनी जिजाऊ, येसूबाई, ताराबाई, कित्तूर राणी चेन्नम्मा, किरण बेदी, पी. टी. उषा, तेजस्विनी सावंत, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, लता मंगेशकर, द्रौपदी मुर्मू, प्रतिभा पाटील, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा अशा अनेक महान महिलांच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा विंदा पेडणेकर, उपाध्यक्षा काव्या पंडित तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी मुग्धा पेडणेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये प्रेरणा, आत्मविश्वास आणि इतिहासातील महान महिलांविषयी अभिमानाची भावना निर्माण झाल्याचे समाधान शिक्षकवर्गाने व्यक्त केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles